यावर्षी करण्यात आलेल्या वन्यजीव गणनेचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर झालेले नसले तरी गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ च्या आधारे गतवर्षांच्या तुलनेत यावर्षी गोंदिया जिल्हयातील जंगलामधील पट्टेदार वाघांची संख्या आठवरून सहापर्यंत घटल्याने दोन वाघ कुठे बेपत्ता झाले या चितेंने वन खात्याला ग्रासले असून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
मागील वर्षी करण्यात आलेल्या गणनेत गोंदिया जिल्हयातील नागझिरा, नवीन नागझिरा आणि नवेगावबांध परिसरात पूर्ण विकसित झालेल्या आठ पट्टेदार वाघांसोबत वाघांचे तीन बछडे फोटो सेंसेन्स च्या माध्यमातून आढळले होते. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हयाच्या संरक्षित वनक्षेत्रात मागील वर्षांपासून न्यू नागझिरा म्हणून १५० चौरस किलोमीटर वनक्षेत्राची भर पडली. त्यामुळे यावर्षी गोंदिया जिल्हयातील वाघांची संख्या वाढणार अशी अपेक्षा सर्वानाच वाटत होती. मात्र यावर्षी करण्यात आलेल्या गणणेमध्ये सहा वाघ आणि दोन बछडे आढळल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे या पट्टेदार वाघात एक नवीन पाहुण्यांची भर पडली आहे. हा वाघ मध्यप्रदेशच्या जंगलातून आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या 8 पट्टेदार वाघांच्या संख्येत तीनने घट झाली आहे. या तीन पकी एक पट्टेदार वाघाने गोंदिया जिल्हा सोडून कान्हा अभयारण्यातील नविन क्षेत्रात प्रवेश केला असल्याची विश्वसनीय माहिती वाघाच्या छायाचित्रावरून मिळाली आहे. जिल्हयातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्र व साकोली तालुक्यातील जंगलात धुमाकूळ घालून अनेकांची बळी घेणारी वन विभागाच्या तिला जेरबंद करण्याच्या सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर गोळया घालून ठार करण्यात आलेली वाघिणसुद्धा चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातून स्थलांतरित झालेली होती. त्यामुळे कान्हा परिसरात प्रवेश करणा-या वाघाप्रमाणे इतर दोन वाघांनीही आपले नवीन क्षेत्र शोधण्यासाठी सालिंतर केले असावे किंवा संरक्षित क्षेत्रातून इतर जंगलाकडे धाव घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात वन्यजीव संरक्षण विभागाचे उपवनसंरक्षक गुरमे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी फोटो सेन्सेंसमध्ये पट्टेदार वाघांची संख्या कमी आढळली हे खरे असले तरी त्यांची शिकार झाली असे म्हणता येणार नाही, असा दावा ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. वाघ हा काही पाळीव प्राणी नाही ज्याला बांधून ठेवता येईल.
तसेच जंगलात लावलेल्या कॅमेरासमोर येईलच असेही सांगता येणार नाही. वाघ तरुण झाल्यानंतर आपले स्वतच कार्यक्षेत्र तयार करतो. त्यामुळे इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या जिल्हयात आढळलेल्या पट्टेदार वाघांमधील एक वाघिण असून ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हयातील वाघांची संख्या परत वाढणार असल्याची शक्यता असून निसर्गप्रेमीसाठी ही एक गोड बातमी म्हणावी लागेल.