ज्या प्रमाणात दलित साहित्य निर्माण झाले आणि त्या साहित्याने दलित समाजाला स्वाभिमान व महत्त्व मिळवून दिले, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या वेदना मांडणारे साहित्य निर्माण होण्यासाठी आपणा सर्वाना मनापासून प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी देशपातळीवर ओबीसी साहित्य अकादमीची स्थापना करायला हवी, अशी सूचना दुसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केली.
सत्यशोधक ओबीसी साहित्य परिषदेने आयोजिलेल्या या ओबीसी साहित्य संमेलनास येथील शिवछत्रपती रंगभवनात (क्रांतिबा ज्योतिबा फुले साहित्य नगरी) शनिवारी सकाळी दिमाखात प्रारंभ झाला. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. कुंभार यांनी ओबीसी साहित्य व चळवळीविषयी मुक्त चिंतन केले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन महात्मा फुले यांच्या नातसून नीता होले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर अलका राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे-माळी, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, लेखक बाबूराव गुरव, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, माजी आमदार निर्मला ठोकळ, रिपाइंचे प्रदेश नेते राजा सरवदे, राजा इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून जनता दलाचे (युनायटेड) अध्यक्ष खासदार शरद यादव यांना निमंत्रित करण्यात आले होते.परंतु त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. त्यामुळे आयत्यावेळी नीता होले या उद्घाटक म्हणून लाभल्या. सत्यशोधक ओबीसी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हणमंत उपरे यांनी प्रास्ताविक, तर स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. कुंभार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रमप्रतिष्ठा आणि श्रमिकांना महत्त्व देऊन व त्यांना संघटित करून संघर्षांच्या पायावर नवी चळवळ उभी करावी लागेल, असे मत मांडले. ओबीसींचा इतिहास एक तर नष्ट करण्यात आला आहे किंवा विकृत करण्यात आला आहे. म्हणून नव्या शालेय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करावी, तसेच ओबीसी विद्यार्थी विशेषत: ग्रामीण भागात राहणारे, कारागिरांची मुले शहरात येऊन शिकू शकत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी स्कॉलरशिप व वसतिगृहांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या. आपण प्रतिष्ठित झालो म्हणून प्रस्थापित ब्राह्मण होऊन चालणार नाही, ज्यामुळे आपण प्रतिष्ठित झालो, त्यांच्या ॠणातून मुक्त होण्यासाठी जिथून असू तिथून व जेथे असू तेथे आणि जेवढे जमेल तेवढे काम पुढे न्यायला हवे. आपण उरलेल्या आयुष्यात समाजाला काही देणे लागतो याचे भान ठेवायला हवे, अशी भावनाही संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केली.
संमेलनाच्या उद््घाटनपर केलेल्या छोटेखानी भाषणात नीता होले यांनी महात्मा फुल्यांनी पुण्यात प्रथमच उभारलेल्या क्रांती शाळेच्या इमारतीची दैन्यावस्था झाल्याकडे सर्वाचे लक्ष वेधले. या क्रांती शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून आपले प्रयत्न सुरू असून याकामी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या तीन महिन्यात क्रांती शाळेचे काम पूर्ण  होईल, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी नमूद केले. पुण्यात एकीकडे गणपतीला सोन्याचा मुकुट व लाखोंची रक्कम टाकली जाते, त्याच पुण्यात महात्मा फुल्यांनी उभारलेल्या क्रांती शाळेची अशी दैन्यावस्था व्हावी, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी सर्वानी ताकद पणाला लावून प्रयत्न करावेत, अशी हाकही नीता होले यांनी दिली.
या वेळी महापौर अलका राठोड व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्यासह कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, माजी आमदार निर्मला ठोकळ, रिपाइं आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे, रिपाइं गवई गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे आदींची भाषणे झाली. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, व्यापार व औद्योगिक क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात किशोर कटारे (सत्यशोधक उद्योगरत्न), प्रा. डॉ. अजीज नदाफ (सत्यशोधक साहित्य गौरव), अनिल वाघाळकर (सामाजिक गौरव), रंजना कोल्हे माळी (आदर्श माता), भीमराव जाधव गुरूजी (शिक्षण गौरव) संजय नवले (शिक्षण गौरव) व आनंद बनसोडे (विशेष गिर्यारोहक पुरस्कार) यांचा समावेश होता. पुरस्कार मानकऱ्यांतर्फे किशोर कटारे यांनी मनोगत व्यक्त केले. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.