मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यांत आरक्षण द्यावे, मात्र राजकारणात कसलेही आरक्षण देऊ नये, त्याला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे. कोणत्याही स्थितीत मराठा समाजाला राजकीय आरक्षण आम्ही मान्य होऊ देणार नाही, असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते, राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी येथे सांगितले.
माळी समाजाच्या सावता परिषदेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आगामी निवडणुका जिंकण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप केला. २८८ आमदारांमध्ये २०० आमदार मराठा समाजाचे असतात. महापौर, जिल्हा परिषदेच्या प्रमुखपदी तेच असतात. आता कुठे अन्य समाजाला राजकारणात स्थान मिळू लागले आहे. ते काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे व ओबीसी समाज तो यशस्वी होऊ देणार नाही असे मुंडे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विधानसभेचे कामकाज विरोधकांनी बंद पाडले आहे ते योग्य वाटते का, यावर त्यांनी, त्यात अयोग्य काय आहे असा प्रतिप्रश्न केला. राज्यकर्त्यांनी बेजबाबदारपणे काहीही बोलावे हे कसे चालेल? सत्तेचा व पैशाचा माज आल्यामुळेच त्यांना असे बोलायला सुचते आहे. त्यांची त्यांना शिक्षा व्हायला हवी. विरोधकांची मागणी साधी आहे, त्यांना शिक्षा तरी करा किंवा मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने त्यांच्या त्या अश्लाघ्य वक्तव्याची माफी मागावी. हे ते मान्य करायला तयार नाही म्हणून काम बंद आहे, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या प्रश्नावर हे सरकार अजिबात गंभीर नाही. आणेवारीची जुनी पद्धत आता बंद करायला हवी आहे. ५० पैसे आणेवारी असलेल्या गावात पाण्याची टंचाई नाही असे कसे म्हणता येईल. राष्ट्रीय रोजगार हमीचेही तसेच आहे. आपली जी योजना होती ती आपल्या गरजा पाहून तयार केली होती. केंद्राच्या योजनेत आपल्याला करता येईल असे काहीही नाही. त्यामुळेच अन्य राज्यांपेक्षा आपल्याला पैसे कमी मिळतात व कामेही म्हणावी अशी करता येत नाही. त्यामुळे या योजनेतही राज्याच्या दृष्टिने बदल करायला हवेत असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.
मी दिल्लीत काम करत असलो तरी महाराष्ट्रातही आहे. आगामी निवडणुका होईपर्यंत व झाल्यावरही महाराष्ट्रात असेन, असे मुंडे म्हणाले. नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस चांगले आहेत. गटतट पक्षात नाहीतच असे नाही, मात्र त्याला ते थारा देणार नाहीत व पक्षाची कामगिरी उंचावतील. केंद्राकडून त्यांची निवड एकमताने झालेली आहे असे मुंडे यांनी सांगितले. या वेळी खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शिंदे यांच्या कर्जत मतदारसंघातील अशोक खेडकर तसेच विविध ठिकाणच्या सुमारे १०३ सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बाजार समितीच्या सदस्यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.