काही विशिष्ट जीवनमूल्य जपणाऱ्या, वेळप्रसंगी त्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे नाशिकचे पां. भा. तथा अण्णा करंजकर. सत्याचा आग्रह धरणारे, भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे अण्णा १३ फेब्रुवारी रोजी अमृतमहोत्सवी वर्षांत पर्दापण करीत आहेत. त्यानिमित्त थोडसं..
निष्ठा, स्वार्थत्याग, ध्येयनिष्ठा, अन्यायाविरुद्ध लढायची वृत्ती, सत्याच्या प्रकाशाची दिवटी हाती घेऊन चालणारे काही जण असतात, त्यापैकीच नाशिकचे ज्येष्ठ समाजसुधारक पां. भा. करंजकर ऊर्फ अण्णा हे एक. निर्भीडपणा, सत्याचा आग्रह-निग्रह हा त्यांचा स्थायी भाव. प्रसंगी समोरच्याला दुखावूनही स्पष्ट बोलण्याची वृत्ती. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद, संघर्ष, अपप्रचार या वादळांशी त्यांना सामना करावा लागतो.
अण्णा कृतिशील कार्यकर्ते व समाजसेवक. पत्रकारितेत असताना, त्या प्रतिष्ठेचा व पदाचा उपयोग त्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केला. दैनिक गांवकरीचे एक तप वार्ताहर होते. सिन्नर तालुक्यातील पश्चिम विभागात घाटाखालच्या खेडय़ात त्यांच्या प्रयत्नांमुळे पहिला वीजपंप आला. नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी त्र्यंबकरोडवर पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी शासकीय एक एकर एक गुंठा क्षेत्र असलेली जागा मिळवून दिली. दादासाहेब पोतनीस यांच्या मदतीने भगूर-पुणे बस सुरू केली. व्यसनमुक्ती व आध्यात्मिक सुसंस्कारांसाठी भगूरला त्यांनी स्वत:ची प्रशस्त जागा श्री स्वामी समर्थ केंद्रास दिली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भगूर पालिकेवर जनतेमधून निवडून आलेले हे पहिले पत्रकार. पालिकेला करंजकरांनी उत्कर्षांप्रत नेले. वर्षांनुवर्षे गढूळ पाणीपुरवठा होत असलेल्या भगूरकरांना त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच शुद्ध पाणी प्यायला मिळू लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान उभारले. प्राथमिक शाळेची टुमदार इमारत झाली. वीज उपकेंद्र आले. पशुवैद्यकीय दवाखाना झाला. रस्ते झाले. विकासकामे राबवून पालिका कर्जमुक्त केली. भगूर पालिकेचा महापालिकेत समावेश करावा, हा ठरावही प्रथम त्यांनी केला.
अण्णा हजारे यांच्या सहवासात आचारविचारांना नवी दिशा मिळाली. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अण्णा आज ही चाळिशीच्या तरुणाप्रमाणे कार्यरत आहेत. त्यांच्या आदर्शाच्या कल्पना कृतीत आणल्या. त्यांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह प्रचलित रूढी, परंपरा, बडेजाव, थाटमाट बाजूला ठेवून साधेपणाने केले. शासकीय, निमशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांविना असलेल्या केबिनमध्ये विनाकारण जळत असलेले विजेचे दिवे, पंखे ते स्वत: बंद करतात. जनतेला विचारास प्रवृत्त करायला लावणारी विचारपत्रके काढायची हा त्यांचा निरंतर उद्योग. समाजसेवेसाठी अविरत झटणारे अण्णा त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळे.