शनीची सूर्याशी २८ एप्रिल रोजी प्रतियुती होणार असून या नैसर्गिक घटनेमुळे तो पृथ्वीच्या जवळ येणार आहे. यामुळे रविवारी रात्रभर शनी आणि त्याच्या कडय़ाचे तेजस्वी रूपाचे सुस्पष्ट दर्शन घेण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध झाली आहे.
आपल्या सौरमालेतील शनी हा एक वैशिष्टय़पूर्ण ग्रह. त्याचा व्यास पृथ्वीच्या नऊ पट तर वजन पृथ्वीच्या वजनाच्या ९५ पट आहे. तो आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा असून (गुरू सर्वात मोठा आहे) त्याचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे त्याला असलेली कडी. शनी पृथ्वीच्या कक्षेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. २८ एप्रिल रोजी त्याची सूर्याशी प्रतियुती होणार आहे. याचा अर्थ असा की, सूर्य आणि शनी पृथ्वीच्या तुलनेत विरुद्ध बाजूंना असणार आहेत. त्यामुळे २८ एप्रिल रोजी सूर्य (अर्थातच पश्चिमेकडे) मावळल्यावर (पूर्वेकडे) शनी उगवेल. तो आकाशात रात्रभर दर्शन देईल. शनीचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर १२७ कोटी किलोमीटर असते. परंतु, प्रतियुतीच्या वेळी ते कमी होईल. ते अंतर सुमारे ११७ कोटी किलोमीटर असेल. म्हणजे शनी सुमारे १० कोटी किलोमीटरने जवळ येणार आहे. त्यामुळे शनी तेजस्वी दिसेल आणि त्याचे कडेही तुलनेने स्पष्ट दिसेल, अशी अपेक्षा आहे. पण, यासाठी मोठय़ा दुर्बीणीतून निरीक्षण करणे आवश्यक आहे. सूर्य आणि शनी यांची अशी प्रतियुती सुमारे एक वर्षांच्या कालावधीनंतर होते. ही संधी आपण दवडता कामा नये. सूर्य आणि शनी यांची प्रतियुती ही निव्वळ नैसर्गिक घटना असून तिचा मानवी जीवनावर कोणताही अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होणार नाही. ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे आणि इतरांनाही आवर्जून सांगितली पाहिजे.