घरात, कार्यालयात, वाहनात फुल्ल एसीची थंडगार हवा खात जनतेच्या समस्या सोडविणाऱ्या पुढाऱ्यांना सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ रस्त्यावर उतरावे लागले आहे. मात्र एसीची सवय असलेल्या या पुढाऱ्यांना ऑक्टोबर हीटने हैराण केले आहे. यामुळे अनेकांनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडण्यास अधिक पसंती दिली आहे.
शेतीत, कंपनीत, रस्त्यावर राबणारे कष्टकरी, कामकरी घामाच्या धारांनी भिजून मेहनत करतात. त्यांच्या घामामुळेच देशाच्या विकासात भर पडते. असे असले तरी या कष्टकऱ्यांना न्याय देण्याची भाषा करणारे नेते मात्र चोवीस तास एसीची थंडगार हवा खात असतात. विधानसभेच्या निवडणुकीचा कालावधी नेमका ऑक्टोबर महिन्यात आला आहे. भर उन्हात सभा होत असल्याने त्यांच्या सभांना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर हीट म्हणजे धडधाकटालाही सहन न होणारे तापमान असते. या तापमानात अनेक जणांना आजारी पडावे लागते. सध्या याचा परिणाम जाणवू लागला असून अनेक ठिकाणी तापाची साथही सुरू झालेली आहे. मात्र ऑक्टोबर हीट ही निसर्गाची गरज आहे. याच काळात शेतीची पिके बहरून त्यांना दाणे लागलेले असतात. दाण्यांना तयार होण्यासाठी या तापमानाची आवश्यकता असल्याची माहिती पिरकोन येथील शेतकरी विशाल गावंड यांनी दिली आहे. त्यामुळे अशाही स्थितीत कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहेत. या उन्हाच्या तडक्यापासून कसे वाचावे याची वर्षांनुवर्षांची या कष्टकऱ्यांची सवय आहे. मात्र ऐन ऑक्टोबरमध्येच निवडणुकांचा प्रचार आल्याने अनेक पुढाऱ्यांना त्यांच्या एसीविनाच राहावे लागत असल्याचेही चित्र आहे.