पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या सत्र परीक्षा होऊन पंचेचाळीस दिवस उलटूनही अजून या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण विद्यापीठाकडे न पाठवल्यामुळे निकालाचे काम लांबल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबरमधील सत्र परीक्षांचे अजूनही निकाल लागलेले नाहीत. नियमाप्रमाणे परीक्षा झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. मात्र, पंचेचाळीस दिवसांची मुदत उलटूनही अजून परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. बी.एस.एल. आणि एल.एल.बी, बी.कॉमचे द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचे निकाल ३० नोव्हेंबपर्यंत जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, निकाल जाहीर करण्याची मुदत संपूनही महिना उलटून गेला, तरी हे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. त्याचप्रमाणे बी.कॉम.च्या प्रथम वर्ष परीक्षेचे आणि बीएस्सी. बायोटेक्नॉलॉजी या विद्याशाखेच्या परीक्षेचे निकाल ३ डिसेंबपर्यंत, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे निकाल ८ डिसेंबपर्यंत, बीबीएम परीक्षेचा निकाल १३ डिसेंबपर्यंत, डिबीए परीक्षेचा निकाल १७ डिसेंबपर्यंत, बीएचा प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल २० डिसेंबर, तर द्वितीय आणि तृतीय वर्षांचे निकाल २१ डिसेंबपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, यातील कोणत्याही परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. आतापर्यंत फक्त औषधनिर्माण विद्याशाखेचे (बी.फार्म) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या शाखेला विद्यार्थी संख्या तुलनेने कमी होती, त्यामुळे हे निकाल वेळेवर जाहीर करणे शक्य झाल्याचे परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
निकाल का लांबले?
उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्र (कॅप) महाविद्यालयांमध्ये असावे की विद्यापीठात, या वादात अनेक विद्याशाखांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन उशिरा सुरू झाले. त्यानंतर काही विद्याशाखांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठामध्ये, तर काही विद्याशाखांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काही महाविद्यालयांनी आयत्यावेळी महाविद्यालयामध्ये उत्तरपत्रिकांचे तपासणी केंद्र सुरू करण्यासाठी असमर्थता दाखवल्यामुळे नवीन महाविद्यालयाकडे विचारणा करणे, या नाटय़ामध्ये बराच वेळ गेल्यानंतर प्रत्यक्ष मूल्यांकनाचे काम सुरू झाले. त्यामुळे मुळातच मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी वेळ लागला. महाविद्यालयाने घेतलेल्या अंतर्गत परीक्षांचे आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण हे महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे पाठवले जातात. अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे वेळेवर गुण न पाठवल्यामुळे निकाल लांबणीवर पडले आहेत. या परीक्षेपासून ऑनलाईन पद्धतीने गुण पाठवण्याची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांना या पद्धतीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून निकाल मिळण्यासाठी वेळ जात असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.      
निकाल लांबल्याचे परिणाम
विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकाल या संबंधीचे वेळापत्रक पूर्वनियोजित असते. एखाद्या परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले की त्याचा विद्यापीठाच्या पुढील परीक्षांवरही परिणाम होतो. या परीक्षेचे निकाल अजून जाहीर झाले नसल्यामुळे पुढील परीक्षेच्या अर्जविक्रीचे वेळापत्रक जाहीर करता येऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व परीक्षांचे निकाल लांबल्याचा परिणाम विद्यापीठाच्या पुढील परीक्षांच्या वेळापत्रकावरही होणार असल्याचे मत परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.