जिल्हय़ात रविवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अर्धा तास बरसलेल्या अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. गहू, ज्वारी, हरभरा, करडी पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले गहू, ज्वारीचे पीक पावसाने मातीमोल करून टाकले. वादळी वाऱ्यासह काही भागांत गारपीट झाली.
दिवसभर पावसाचे कोणतेच चिन्ह नव्हते, परंतु सायंकाळी आकाश ढगाळ जाणवू लागले. उन्हाळा सुरू झाल्याने वातावरणात दिवसभर उकाडा होता. संध्याकाळी मात्र आकाशात जमा झालेले ढग आणि सोसाटय़ाचा वारा यामुळे वातावरण अचानक बदलले. सायंकाळी गंगाखेड, पालम परिसरात, परभणी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांचे मोठेच नुकसान केले. काही भागांत गव्हाचे पीक काढणीस आले होते. मात्र, अवकाळी पावसाने हे पीक जमीनदोस्त करून टाकले. अनेक भागात ज्वारीची कापणी झाली होती. ज्वारीच्या पेंढय़ा शेतकऱ्यांनी शेतात करून ठेवल्या होत्या. परंतु पावसाने ज्वारीचे पिकाचेही नुकसान झाले. पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसात वाऱ्याचा जोर अधिक असल्याने, त्यातच वीज गायब झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात काही ठिकाणी लावलेले होìडग्ज वाऱ्याने खाली पडले. परभणी तालुक्यातील दैठणा, साळापुरी शिवारात पावसाने मोठे नुकसान केले. जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. डोहरा, मुडा, बोर्डी, देवगाव, धानोरा, दुधगाव, आसेगाव, िपप्री परिसरात गारपीट झाली. गहू, ज्वारीचे मोठे नुकसान तर झालेच, तसेच अनेक ठिकाणी हरभऱ्याची काढणी सुरू होती. पावसामुळे शेतात काढून टाकलेला हरभरा भिजला. वाऱ्यामुळे गहू, ज्वारी पिके आडवी झाली. जिंतूरसोबतच पालम तालुक्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला.
पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, माणिक पोंढे, दगडू काळदाते, माणिक भालेराव, राजू कापसे, अतुल सरोदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.