अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कल्पकता आणि कसब यांचा कस पाहणाऱ्या ‘बाजा, २०१४’ या राष्ट्रीयस्तरावरील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’ची ‘ऑफ रोड’ कार सज्ज झाली आहे.
व्हीजेटीआयच्या ‘टीम मोटरब्रिथ’ने दीड वर्षे खपून तयार केलेली ही कार प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली. अभियांत्रिकी क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची व्हीजेटीआयची ही तिसरी खेप आहे. या वेळेस आम्ही कारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करून ती अधिक अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे, असे या ‘मोटरब्रिथ’चे नेतृत्व करणाऱ्या आकाश सांबरेकर या विद्यार्थ्यांने सांगितले.
कारमध्ये वापरण्यात आलेल्या सीव्हीटी तंत्रामुळे ही कार अधिक ‘स्मूद’ झाली आहे. यात पूर्णपणे ‘कस्टमाइज्ड फॉरवर्ड न्यूट्रल रिव्हर्स गिअरबॉक्स’ वापरण्यात आला आहे. ती ‘लो बॅटरी इंडिकेटर’वर चालते. तंत्राबरोबरच ‘स्मार्ट लूक’ हे या कारचे आणखी एक वैशिष्टय़. या कारचे डिझाइन आणि निर्मिती करण्यासाठी व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांना तब्बल दीड वर्ष लागले.
पुढील आठवडय़ात ‘बाजा, २०१४’ या इंदूरमधील पिथमपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत ही कार सहभागी होईल. यात देशभरातून १२० अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर चालू शकेल अशी कार तयार करण्याचे आव्हान या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पेलायचे असते. या स्पर्धेत अभियांत्रिकी आणि खास करून ऑटोमोबाइल क्षेत्रातील अनेक लहानमोठय़ा कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देत असतात. या सर्वाच्या समक्ष आपले कसब पणाला लावण्याची संधी विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने मिळते.