ऑफ-रोड कार स्पर्धेत ‘बहारदार यश
अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हाने पेलण्याचे तरुणाईचे कसब विद्यार्थिदशेतच पारखण्यासाठी जागतिक स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘बाहा एसएई’ या स्पर्धेत माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑफ-रोड कारने भारतातून पहिल्या दहामध्ये येण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे व्हीजेटीआयच्या या कारला २०१४च्या बाहा स्पर्धेत थेटपणे सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.
एसएई म्हणजे ‘दि सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल एक लाख २८ हजार एरोस्पेस, ऑटोमेटिव्ह आणि कमर्शिअल व्हेईकल उद्योगातील तज्ज्ञांची संस्था आहे. यात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते. ही संस्थेची ‘एसएईइंडिया’ ही उपशाखा भारतात विविध स्पर्धाचे आयोजन करते.
अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी तरुणांच्या सुपीक डोक्याला उद्युक्त करता यावे यासाठी एसएईतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बाहा, सुप्रा, एफिसायकल आदी स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी बाहा आणि सुप्रामध्ये ‘व्हीजेटीआय’ २०१०पासून सहभागी होत आहे. २०१०मध्ये या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होताना संस्थेचा ‘मोटरब्रीथ’ हा १५ विद्यार्थ्यांचा चमू ८० चमूंमधून ५९वा आला. शिवाय ‘दि बेस्ट कन्सेप्ट कार’चे बक्षीसही या स्पर्धेत व्हीजेटीआयने पटकावले होते. २०१२मध्ये मोटरब्रीथची कामगिरी ५९ वरून ३७ अशी सुधारली. शिवाय या वेळी या चमूने ५० हजार रुपयांचे ‘रफ्तार’ पारितोषिकही पटकावले. आता ‘व्हीजेटीआय’ची ऑफ-रोड कार २०१४च्या ‘बाहा’ स्पर्धेसाठी तयार होते आहे. मोटरब्रीथने आधीच्या कारमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करून त्याचे मॉडेल पूर्वचाचणी स्पर्धेत सादर केले. या मॉडेलला स्पर्धेत दहावा क्रमांक मिळाला असल्याने ते आता २०१४च्या बाहा-एसएई स्पर्धेच्या अंतिम फेरीत थेटपणे सहभागी होईल, असे मोटरब्रीथचा कॅप्टन आकाश छावछारिया याने सांगितले.

व्हीजेटीआयच्या ‘ऑफ-रोड’ कारचे वैशिष्टय़
नेहमीच्या रस्त्याऐवजी डोंगराळ, खडकाळ, पाणथळ, खड्डय़ांनी भरलेल्या वेडय़ावाकडय़ा रस्त्यांवर चालण्याची या कारची क्षमता आहे. म्हणून तिला ‘ऑफ रोड’ कार म्हटले जाते. त्यामुळे ती पुरेशी मजबूतही असावी लागते. यंदाच्या बाहाचे बाह्य़रूप गेल्या वर्षीप्रमाणेच दिसत असले तरी तिच्या कामाच्या पद्धतीत मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे गीयरच्या कार्यपद्धतीतला. नव्या ‘बाहा’मधील गीयर अधिक वैशिष्टय़पूर्ण आणि कार्यक्षम करण्यात आले आहेत, असे आकाशने सांगितले. ‘ही कार तयार करण्यासाठी तब्बल चार लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च संस्थेला झेपणारा नसल्याने आम्हाला यासाठी प्रायोजकांची गरज आहे,’ अशी आपली अडचणही त्याने सांगितली.

‘मोटरब्रीथ’विषयी
मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आधी विविध अभियांत्रिकी शाखांच्या पण ऑटोमोबाइल क्षेत्रात रस असलेल्या ‘व्हीजेटीआय’च्या विद्यार्थ्यांची मिळून ‘दि सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल इंजिनीअर्स’ (एसएई) संस्थास्तरावर कार्यरत आहे. या सोसायटीतील विद्यार्थ्यांची निवड बाहा किंवा सुप्रा स्पर्धेकरिता केली जाते. या विद्यार्थ्यांचा चमू ‘टीम मोटरब्रीथ’ म्हणून ओळखला जातो. यंदा २५ विद्यार्थ्यांच्या मोटरब्रीथने ‘बाहा, २०१४’ तयार केली आहे. २०१४ मध्ये इंदूरमध्ये २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान बाहाची अंतिम स्पर्धा होईल.