जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने थैमान घातले. यात जीवितहानी झाली नसली, तरी गारांच्या माऱ्याने पिकांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बिलोली तालुक्यात अंजनी येथे दहा विद्यार्थ्यांना गारपिटीचा मारा सहन करावा लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन घडले नाही. बिलोली, किनवट, हदगाव, देगलूर, नायगाव तालुक्यांच्या अनेक भागात गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. कच्च्या घरांनाही याचा फटका बसला. आंब्याचा मोहर गळाल्याने यंदा आंबा महागण्याची चिन्हे आहेत. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत होता. गारांच्या पावसाने शेतातील गहू, हरभरा, टाळकी या पिकांना मोठा फटका बसला. लोहा तालुक्यातील मारतळा, कामळज, कौडगाव, उमरा, कापसी, गोळेगाव, हातणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. बिलोली तालुक्यात विजांच्या कडकडाटात गारपीट झाली. तालुक्यातील टाकळी थडी, चिरली, कौठा, दुगाव, गुजरी, कांगठी, खापराळा, केरूर, डोणगाव, बिजूर कोळवाग आदी भागात जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
 अनेक तालुक्यांत रब्बी ज्वारी हे महत्त्वाचे पीक असते. गारपिटीमुळे हे पीक आडवे झाले. पर्यायाने ही ज्वारी काळी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय पातळीवर नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत अजून कोणत्याही हालचाली नाहीत. सरकारने गारपीटग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनी दिला. शुक्रवारीही अनेक भागात ढगाळ वातावरण होते. परंतु कुठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.