सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर वर्षभर खेळणारे अनेक ट्रेकिंग ग्रुप मुंबई, पुणे, नाशिकमध्ये आहेत. या गडकोटांच्या पायथ्याशी असलेल्या खेडय़ांतील दारिद्रय़ अशा ट्रेकर्सना नवीन नाही. त्यांना मदत करणारे अनेक ग्रुप आज या शहरांमध्ये आहेत. यापैकीच ‘ऑफबिट सह्य़ाद्री’ हा ट्रेकिंग ग्रुप गेली चार वर्षे सातत्याने दिवाळीला अशा गावांमध्ये जाऊन त्या गावकऱ्यांसह अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करत आहे. यंदा या ग्रुपने अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील राजूर गावापासून ६० किलोमीटर लांब असलेल्या कुमशेत या गावात दिवाळी साजरी केली.
ट्रेकिंगच्या निमित्ताने सह्य़ाद्री पालथा घालताना आम्हाला या गावकऱ्यांची हलाखीची परिस्थिती नेहमीच दिसते. अनेकदा आम्ही त्यांच्या घराच्या पडवीत विसावा घेतो. त्यांच्याकडून डाळ-भात किंवा पिठलं-भाकरी असे जेवणही तयार करून घेतो. अवघड किल्ल्यांवर जाण्यासाठी तेच आमचे वाटाडे असतात. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अनोखा बंध निर्माण होतो. ट्रेकिंगला जाताना आम्ही त्यांच्यासाठी काही सामान घेऊन जातच असतो. मात्र यापैकी अनेक गावे अशीही आहेत, जेथे फराळ, आकाशकंदील वगैरे गोष्टींची नावेही माहीत नाहीत. ही परिस्थिती समोर आल्यानंतर प्रीती पटेल, राजस देशपांडे आणि झिनत शिकिलकर यांनी एकत्र येऊन अशा गावांमध्ये दिवाळीचा आनंद घेऊन जाण्याचे ठरवले, असे ऑफबिट सह्याद्रीच्या संस्थापक सदस्य प्रीती पटेल यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात पनवेलजवळच्या प्रबळ माची या गावापासून झाली. या गावात त्यांनी फराळ वाटला. त्यानंतर विचार करता करता या तिघांच्या असे लक्षात आले की, शहरात फॅशनचा ट्रेंड बदलला की, चांगले कपडेही जुने ठरवून बाद केले जातात. मग त्यांनी असे कपडे गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर हळूहळू पुण्या-मुंबईतील १५ जण आणखी जोडले गेले. मग तर त्यांनी आणखी उत्साहाने काम करत दुसऱ्या वर्षी मुरबाडजवळच्या सिद्धगड माचीवर जुने कपडे आणि फराळ यांचे वाटप केले.
आम्ही वर्षभरात खूप ट्रेक्स करत असतो. प्रत्येक ट्रेकला आम्ही त्या किल्ल्याजवळच्या गावांतील परिस्थिती पाहत असतो. मग आम्ही आमच्याकडे त्या गावांची नोंद ठेवतो. दिवाळीच्या दीड-दोन महिने आधी आम्ही त्यातील सर्वात गरजू गाव निवडतो आणि तेथे जाऊन फराळ, स्टेशनरी साहित्य, जूने कपडे, खेळणी यांचे वाटप करतो, असे प्रीती म्हणाली. कुमशेतमध्ये दिवाळी फराळ वाटताना आम्हाला या गावाच्या आसपास असलेल्या ३ पाडय़ांचाही विचार करावा लागला. त्यामुळे आम्ही यंदा तब्बल १२ मोठय़ा गोणी कपडे, काही स्टेशनरी सामान, फराळाची शंभर पाकिटे आणि काही खेळणी असे खूप साहित्य जमवले. लोकांनीही या कामात आम्हाला भरभरून मदत केली. त्यामुळे हे काम अधिक सुलभ झाले. आता तर लोकांचा वाढता प्रतिसाद बघून गेल्या वर्षीपासून आम्ही असाच उपक्रम गुढीपाडव्यालाही राबवण्यास सुरुवात केली आहे, असे प्रीती म्हणाली.
आनंदच वेगळा
वर्षभर ज्यांच्या मदतीमुळे सह्य़ाद्रीतल्या आमच्या खडतर वाटा सुलभ होतात, त्यांना दिवाळीच्या सणाचा थोडासा आनंद देणे, खूपच मस्त आहे. लहान मुलांना खेळणी वाटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, यासारखे दुसरे समाधान नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरापासून लांब अशी दिवाळी साजरी करणे कधीही सुखावह आहे.- प्रीती पटेल.
दरवर्षी जाणार
यंदा मी पहिल्यांदाच ऑफबिट सह्य़ाद्रीच्या या उपक्रमात सहभागी झालो. थोडाफार त्रासाचा प्रवास करून गावात गेल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच आमचे कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले. यापुढेही माझ्या मुलीचे कपडे, खेळणी, नातेवाईकांकडील कपडे वगैरे गोळा करून मी या उपक्रमात सहभागी होत राहणार आहे. – अमित राईलकर.