मनपा आयुक्तांवर काठीहल्ल्याचा प्रयत्न
परभणी महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यावर काठीहल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नगरसेविकेचे पुत्र अ‍ॅड. राजेश देशमुख यास अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील, असा निर्धार सर्व कर्मचारी संघटनेने बुधवारी जाहीर केला. दरम्यान, काठीहल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अ‍ॅड. राजेश देशमुख व अक्षय देशमुख या दोघांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला. शंभरकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांनी ‘बटीक’ समजू नये, असे आयुक्त शंभरकर यांनी सुनावले. काम बंद आंदोलनादरम्यान महापालिकेपुढे कर्मचाऱ्यांची भाषणे झाली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शंभरकर हे मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील आपल्या निवासस्थानी बसले असताना अ‍ॅड. देशमुख तेथे आले व विकासनगरमधील सिमेंट रस्त्याच्या कामाच्या धनादेशावर सही करावी, म्हणून आयुक्तांना दमदाटी करीत काठीहल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच मनपाच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले.
 या वेळी शंभरकर यांनी मंगळवारी रात्री घडलेला प्रकार कथन करून विकासनगरमध्ये झालेले सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट व बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे धनादेश काढण्यापूर्वी कामाची पाहणी करावी, असा शेरा नोंदपुस्तिकेत नोंदविला आहे.
हीच बाब नगरसेविका वनमाला देशमुख यांचे पुत्र अ‍ॅड. राजेश यांना खटकली व त्यांनी काठीहल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी देशमुख यास निवासस्थानाबाहेर काढले. ही बाब फारशी गंभीर नसली तरीही या मागची प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे, असे स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्था लोकांच्या सेवेसाठी आहे. पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे व त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी, अशी पद्धत आहे. तरीही काही सदस्य मर्यादा सोडून वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
कर्मचाऱ्यांनाही आत्मसन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन-चार नगरसेवकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संस्था व शहर बदनाम होत आहे. त्यामुळे महापालिकेत शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापौर प्रताप देशमुख व विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.
शंभरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी अ‍ॅड. देशमुख यास अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील, असे या वेळी कामगार व कर्मचाऱ्यांनी जाहीर केले. नगरपालिका कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपायुक्त दीपक पुजारी, सहआयुक्त मुजीब खान, ज्योती कुलकर्णी, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पांचाळ, प्रवीण भाणेगावकर, जाधव यांची भाषणे झाली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आंबेडकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.