डोंबिवली पश्चिमेतील टेलकोसवाडी, गरिबाचापाडा, गणेशनगर भागातील काही भूमाफियांनी अनधिकृत इमारती, चाळी उभारून त्यास महापालिकेच्या जलवाहिनीतून चोरून नळ जोडण्या घेतल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने या भूमाफियांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील वादग्रस्त २४ अनधिकृत इमारतींमधील चार भूमाफियांविरोधात गेल्या महिन्यात महापालिकेने गुन्हे दाखल केले होते. बुधवारी याच अनधिकृत इमारतींमधील नऊ भूमाफियांविरोधात ह प्रभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी गुन्हे दाखल केले. सुरेश जोशी, राजा जोशी, वत्सला भगवान काठे, जगदीश म्हात्रे, सुखदेव म्हात्रे, बंडू म्हात्रे, विनोद भोईर, अरुण जोशी आणि अशोक भोईर अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सुरेश जोशी यांनी ‘शांताराम सदन’ नावाची चार माळ्याची अनधिकृत इमारत मे २०११मध्ये उभारली आहे. त्यामध्ये ३१ भाडेकरू राहतात. राजा जोशी यांनी ‘शिवशक्ती कृपा’ नावाची अनधिकृत इमारत उभारली आहे. त्यामध्ये ४ भाडेकरू राहतात. वत्सला यांची गणेशनगरमध्ये ‘भगवान काठे’ इमारत आहे. त्यामध्ये १४ भाडेकरू राहतात.
जगदीश म्हात्रे यांनी गरिबाचावाडा येथे ३३ चाळ रूमचे बांधकाम केले आहे. त्यामध्ये ४६ भाडेकरू राहतात. सुखदेव यांनी कुंभारखाणपाडा येथे बांधकाम केले आहे. बंडू यांनी ६ चाळ खोल्यांचे बांधकाम केले आहे. विनोद यांनी टेलकोसवाडीत तीन माळ्याची ‘अरुणोदय’ अनधिकृत इमारत उभी केली आहे. त्यामध्ये ३० भाडेकरू राहतात. अरुण जोशी यांनी गणेशनगरमध्ये दोन माळ्याची इमारत उभारली आहे. त्यामध्ये १७ भाडेकरू राहतात. अशोक भोईर यांनी टेलकोसवाडीत ४ माळ्यांची अनधिकृत इमारत बांधली आहे. त्यामध्ये २२ रहिवासी राहतात.
या सर्व अनधिकृत इमारतींना चोरीने घेतलेल्या नळ जोडण्यांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या पाणी देयकाचा भरणाही या ठिकाणी केला जात नाही.