ठाकुर्ली येथील महिला समिती इंग्लिश शाळेच्या चार संचालकांविरुद्ध शाळेच्या शिक्षिकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या शिक्षिकेला डावलून बनावट कागदपत्र तयार करून अन्य एका साहाय्यक शिक्षिकेला मुख्याध्यापकपदी विराजमान केल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. किरण शिवनाणी या महिला समिती शाळेत मागील काही वर्षांपासून साहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुख्याध्यापक पदासाठी त्या पात्र असताना त्यांच्यापेक्षा कमी सेवा झालेल्या अनिता बालन यांना संचालक मंडळाने मुख्याध्यापकपदी बढती दिली. तसेच आपल्या गोपनीय कागदपत्रांचा अपहार करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली, अशी तक्रार किरण शिवनाणी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणात संस्थेचे शांती सिंग, वर्षां पवार, डी. आर. सिंग, रामभाऊ पवार व अनिता बालन यांना आरोपी करण्यात आले आहे.