निवडणूक अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एखाद्या उमेदवाराने प्रसारमाध्यमांना मुलाखत दिल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिला. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत यापूर्वी मुलाखत देणारे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण तसेच नाशिक लोकसभा मतदार संघातील बसपाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यावर काही कारवाई होईल की नाही, याची स्पष्टता मात्र त्यांनी केली नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारले जातात. या ठिकाणी अर्ज दाखल केल्यावर काही उमेदवार लगेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतात. उमेदवार व समर्थकांच्या हालचाली नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे. बंदोबस्तावरील पोलिसांनी अशी मुलाखत देणाऱ्या दिनकर पाटील यांना रोखण्याही प्रयत्न केला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही अर्ज दाखल केल्यावर याच स्वरुपात संवाद साधला होता.
ही बाब निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्षेत्रात उमेदवारांना अशा मुलाखती देण्यावर र्निबध घालण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. अर्ज दाखल करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये. पुन्हा कोणी असा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवडणूक साहित्य वाहतुकीसाठी १५१९ वाहनांची फौज
मतदानाच्या दिवशी निवडणूक साहित्य व कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची तब्बल १,५१९ वाहने लागणार आहेत. त्यात साधारणत: ३९२ बसेस, ३० मिनी बसेस तर २८ टेम्पो व १०४७ जीप व मोटारींचा समावेश आहे. वाहनांच्या या भल्यामोठ्या ताफ्यावर मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची भिस्त राहणार आहे.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील काही भाग धुळे लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १६६४, दिंडोरी मतदारसंघात १७५० तर धुळे मतदारसंघात ७७७ असे जिल्ह्यात एकूण ४१९१ मतदान केंद्र आहेत. निवडणूक मतदानासाठी नाशिक मतदार संघात नऊ हजार १६० तर दिंडोरी मतदार संघात नऊ हजार ६४० असे एकूण १८ हजार ७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांसाठी एकूण चार हजार २०५ मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. मतदान प्रक्रिया विहित मुदतीत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा निवडणूक साहित्यासह आधी रवाना करणे आवश्यक ठरते. हजारो कर्मचारी व निवडणूक साहित्याची सुरळीतपणे वाहतूक व्हावी याकरिता जिल्हा निवडणूक शाखेने नियोजनाला वेग दिला आहे. हे नियोजन करताना मतदान केंद्राच्या ठिकाणाचा आढावा घेण्यात आला. म्हणजे एखाद्या पाडय़ावर असणाऱ्या मतदान केंद्रावर एसटी बस पोहोचू शकणार नाही. त्या ठिकाणी टेम्पो अथवा जीपद्वारे निवडणूक साहित्य व कर्मचाऱ्यांची ने-आण केली जाणार आहे. अशा सर्व बाबींचा विचार करून या कामासाठी ३९२ बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे नोंदविण्यात आली आहे. या शिवाय, काही प्रमाणात मिनी बसची व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी सर्वाधिक म्हणजे १०४७ जीप व मोटार यांचा वापर केला जाईल. या कामासाठी लागणाऱ्या १५१९ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.