आरक्षणाच्या मुद्यावर महामानवांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर प्रदर्शित केल्याच्या निषेधार्थ रविवारी व सोमवारी बुलढाणा शहरात अघोषित बंद पाळण्यात आला. या घटनेचे पडसाद सोमवारीही जिल्ह्य़ात उमटले. सोमवारी चिखलीत बंद पाळण्यात आला. रविवारी व सोमवारी बुलढाणा व चिखलीचा आठवडी बाजार होऊ शकला नाही. तणावाच्या अनामिक भीतीमुळे जनजीवन मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाले.
काही समाजकंटकांकडून फेसबुकचा गैरवापर करण्यात येत असून महापुरुषांबद्दल विकृत लिखाण करून सामाजिक भावना दुखावल्या जात आहे. या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल शनिवारी रात्रीपासूनच जिल्ह्य़ात तणाव आहे. महामानवाची विटंबना होईल, असा आक्षेपार्ह मजकूर शनिवारी संध्याकाळी फेसबुकवरून प्रकाशित करण्यात आला. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच भीमनगर, मिलिंदनगर, आंबेडकरनगर, सरस्वतीनगर आदि वस्तीतील ४०० ते ५०० नागरिकांचा जमाव शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमला. तणावाची परिस्थिती पाहता ठाणेदार नारायण तांदळे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी डॉ.तरुण कोठारीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महापुरुषांच्या विटंबनेच्या निषेधार्थ रविवारी बुलढाण्यात अघोषित बंद पाळण्यात आला.
 बुलढाणा येथे एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. संतप्त जनभावनांचे पडसाद सोमवारीही जिल्ह्य़ात उमटले. सोमवारी दुपापर्यंत बुलढाणा शहरातील अनेक भागात बंद होता. एसटी बसेस पोलिस बंदोबस्तात सोडण्यात आल्या. सुमारे ३० हून अधिक बसेसना पोलिस संरक्षण देण्यात आले. सोमवारी चिखली येथेही बंद पाळण्यात आला. दरम्यानच्या काळात जिल्ह्य़ात अफवांचे पेव फुटले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
त्या माथेफिरूविरुध्द
कारवाई करा
फेसबुकवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह चित्र अपलोड करून जनतेच्या भावना भडकविण्याचे काम काही समाजकंटक व माथेफिरू करीत आहेत. अशा माथेफिरूविरुध्द कठोर कारवाई करून भविष्यात महापुरुषांची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार विजयराज शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.