श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साई प्रसादालयात दानशूरांकडून भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन देण्याची योजना सुरू केलेली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २०४ दिवस भक्तांना या योजनेचा लाभ झाल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, संस्थानने साईबाबांचे अन्नदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवलेले आहे. येणाऱ्या भक्तांना प्रसाद भोजनाचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी संस्थानने निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील संस्थान मालकीच्या ७ एकर जागेमध्ये भव्य असे प्रसादालय उभारले आहे. या प्रसादालयात एका वेळेस पाच हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेऊ शकतात. हॉलमध्ये दिवसाकाठी ३५ हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. गर्दीच्या काळामध्ये ही संख्या ८५ हजारांहून अधिक असते. वर्षांकाठी सुमारे सव्वा कोटी भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. संस्थानने प्रसाद भोजनाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच प्रसादालयातील पाकगृह, भोजनकक्ष, कर्मचारी गणवेश व प्रसादालय परिसराच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यासाठी संस्थान दरवर्षी सुमारे ६० कोटी रुपये खर्च करते. वर्षभरात ३२६ दानशूरांनी दिलेल्या ५ कोटी ११ लाख ८८ हजार ८१२ रुपयांच्या देणगीतून २०४ दिवस साईभक्तांनी श्रींच्या मोफत प्रसादाचा लाभ घेतला.
प्रसादालयातील सुविधांमुळे साईभक्तांना विनाप्रतीक्षा रुचकर प्रसाद भोजन मिळते. त्यामुळे प्रसादालयास आयएसओ नामांकन मिळाले आहे. याशिवाय येथे कार्यान्वित केलेल्या सोलर स्वीन कुकिंग प्रकल्पाचा धार्मिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून केंद्र सरकारने गौरव केला आहे.