News Flash

सरपंचांच्या भूमिकेने अधिकारी अडचणीत

वीजदेयकाच्या मुद्दय़ावर आयोजित बैठकीत सरपंचांनी उन्हाळय़ात पाणीपुरवठा केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले. मात्र, वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली.

| June 19, 2013 01:54 am

जिल्हय़ातील सिद्धेश्वर, मोरवाडी व पूरजळ या तीन संयुक्त गावे पाणीपुरवठय़ाच्या वीजदेयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने या योजनेची वीज खंडित केली. वीजदेयकाच्या मुद्दय़ावर आयोजित बैठकीत सरपंचांनी उन्हाळय़ात पाणीपुरवठा केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले. मात्र, वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली. साहजिकच पाणीपुरवठा विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जिल्हय़ात असलेल्या २५ गावे मोरवाडी, २० गावे पूरजळ व २३ गावे सिद्धेश्वर प्रादेशिक पाणीयोजना जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येतात. परंतु गेल्या दहा वर्षांपासून केवळ टंचाईच्या नावाखाली चालू होतात व त्यांच्या वीजदेयकाचा मुद्दा गाजू लागतो. लाभक्षेत्रात सरपंच वीजदेयकाची रक्कम भरण्यास सहकार्य करीत नसल्याने या योजना नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. केवळ टंचाईच्या नावाखाली पाणीपुरवठा योजनांचा लाभ घेतल्याने वीजदेयकाची थकबाकी दोन कोटींवर गेली आहे.
जिल्हय़ात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या नावाखाली वीजदेयकाचे चालू बिल (४९ लाख) भरून उन्हाळय़ात योजना सुरू करण्यात आली. दरम्यान, या पुढील वीजदेयकाची रक्कम ग्रामपंचायतीने भरण्याचे ठरले होते. परंतु आता मात्र योजनेचे मे महिन्याचे वीजदेयक (सुमारे १२ लाख) थकल्याने १२ जूनला महावितरणने तिन्ही योजनांची वीज खंडित केली आहे. त्यामुळे पाणीयोजना बंद पडल्या आहेत. याच निमित्ताने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एबंडवार यांनी पाणीपुरवठा योजनेच्या लाभक्षेत्रातील सरपंच मंडळींची सोमवारी बैठक घेतली.
दरम्यान, उपस्थित सरपंचांनी उन्हाळय़ात प्रशासनाने पाण्याची सोय केल्याबद्दल आभार व्यक्त केले व वीजदेयकाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविले. २५ गावे मोरवाडी, २३ गावे सिद्धेश्वर, २० गावे पूरजळ या तीनही योजना वीजपुरवठा खंडित केल्याने बंद आहेत. सरपंचांनी वीजबिलाची थकबाकी भरण्यास बैठकीत नकार दिल्याने प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 1:54 am

Web Title: officers in trouble stands to head of a village
टॅग : Hingoli
Next Stories
1 पावसाच्या विश्रांतीमुळे हिंगोलीत पेरण्यांना वेग
2 ग्रंथांमधून मिळेल जीवनाचे सूत्र- न्या. अंबादास जोशी
3 विनयभंग प्रकरणात अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष कदम यांना अटक
Just Now!
X