गलेलठ्ठ पगाराकडे आत्मीयतेने बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडेही तेवढय़ाच आत्मीयतेने बघावे, असा टोला लगावत राज्याचे ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शासनाकडूनही सोलापूर जिल्हय़ासाठी पुरेसा दुष्काळनिधी मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली.
अकलूज येथील सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात तालुक्यातील पाणीपुरवठय़ाची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निशिगंधा माळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, आमदार हणमंत डोळस, पंचायत समिती सभापती राजलक्ष्मी माने पाटील, उपसभापती उत्तमराव जानकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी ढोबळे यांनी अपुऱ्या निधीमुळे जिल्हय़ातील दुष्काळी जनतेची हेळसांड होत असून, त्यास आपण जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली दिली. दुष्काळ निवारणासाठी मंजूर ६५० कोटींपैकी २५० कोटी रुपये हातात आले असून, पाणीपुरवठा व चारा छावण्यासाठी त्याचे नियोजन होणार आहे. टंचाईग्रस्त ग्रामपंचायतीची पाणीपट्टी ६७ टक्के शासन भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही पाणीपुरवठा योजनेची वीजपुरवठा बंद न करण्याचे त्यांनी आदेश दिले. रोजगार हमीच्या कामाची बिले ७ महिन्यांपासून मिळाली नसल्याच्या मुद्यावरून विजयसिंह मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या वर्षांपासून पाणीटंचाईशी झूंज देणाऱ्या गावांचीच टंचाईग्रस्त गावांच्या यादीत नावे नसल्यावरूनही गोंधळ झाला. तालुक्याची आमसभा घेण्यावरूनही डोळस व पंचायत समिती सदस्य के. के. पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. तालुक्यातील चुकीची आणेवारी लागल्याने गावनिहाय माहिती घेऊन दुरुस्ती करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. शिवाय कृष्णाभीमा स्थिरीकरणाचा खर्च १५ हजार कोटींवर गेला असून तो प्रकल्प केंद्र शासनामार्फत व्हावा, यासाठी जिल्हय़ातील आमदारांना घेऊन प्रयत्न करणार असल्याचेही ढोबळे यांनी सांगितले.