योजना व निधी वाटप करताना जिल्ह्य़ातील अधिकारी राजकारण करत आहेत, अशा प्रशासनाला वठणीवर आणावे लागेल. योजना राबवताना दोन्ही खासदारांना अधिकारी माहिती देत नाहीत, चौकशा लावल्या तर अधिका-यांना काम करणे अवघड जाईल, असा गर्भित इशारा भाजपचे खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या सभेत बोलताना दिला.
खा. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा जिल्हा परिषद सभागृहात झाली. यावेळी खा. वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते. आ. चंद्रशेखर घुले काही वेळ बैठकीस उपस्थित राहिले. मागील सभेस अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु आजच्या सभेसही अनेक अधिकारी अनुपस्थित होते किंवा त्यांनी प्रतिनिधी पाठवला होता. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे पत्र संबंधित खात्याच्या प्रमुखांना पाठवले जाणार आहे.
वर्षांनंतरही ‘एनआरएचएम’च्या योजनेतील ३९ रुग्णवाहिका अद्यापि न मिळाल्याने संबंधित एजन्सीचा आदेश रद्द करावा, ग्रामपंचायती सक्षम नसल्याने पाणी योजनांची कामे ग्राम समित्यांकडे न देण्याचा तसेच आंगणवाडी कर्मचा-यांच्या भरतीत अडचणी येत असल्याने निकष बदलण्याचा ठराव समितीत करण्यात आला. अधिकारी योजनांची व निधीची माहिती देत नाहीत, केंद्र सरकारच्या योजनांतील कार्यक्रमासही खासदारांना बोलावत नाहीत, संसदेच्या अधिवेशन काळातच सभा, बैठका आयोजित करतात, खासदारांच्या पत्रांना उत्तरे देत नाहीत, केवळ आमदारांच्या पत्रांना किंमत देतात, योजना राबवताना राजकारण करतात आम्हाला अशा पद्धतीने बाजूला ठेवले तर प्रशासनाला वठणीवर आणावे लागेल, असे वाकचौरे म्हणाले तर गांधी यांनी चौकशी लावली तर अधिका-यांना कामे सुधारणार नाहीत, असा इशारा दिला.
विविध विभागांना केंद्र सरकारकडून मिळणा-या निधीचा व योजनांचा आढावा घेण्यात आला. डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. वसंतराव गारुडकर यांनी प्रास्ताविक केले.
 नरेगाचा केवळ गाजावाजा
नरेगाबाबत पालकमंत्र्यांनी केवळ गाजावाजा करत पैसा उडवला, असा स्पष्ट आरोप खा. वाकचौरे यांनी केला. शिवाजी शेलार यांनी केलेल्या तक्रारीनंतर वाकचौरे यांनी विशेष समाजकल्याण कार्यालयास टाळेच ठोकण्याचा इशारा दिला. राज्य व केंद्र सरकारच्या अन्य योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र त्या अत्यंत घाणेरडय़ा पद्धतीने राबवल्या जात आहेत, असेही वाकचौरे म्हणाले.