जुनी प्रमाणपत्रे चालणार नाहीत, नवी सादर करा अन्यथा प्रवासात सवलत मिळणार नाही या एसटी महामंडळाच्या वाहकांनी अपंगांबाबत सुरू केलेल्या दंडेलशाहीला आळा बसला आहे. आणखी काही महिने जुनी प्रमाणपत्रेही चालतील असा आदेशच महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व आगारांना पाठवला असून त्याची अंमलबजावणी करण्यास बजावले आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे आमदार बच्चू पाटील कडू यांनी याबाबत महाव्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. राज्य सरकारने अपंगांना नव्या संगणक प्रणालीतून नवी प्रमाणपत्रे देण्यास सुरूवात केली आहे. ते काम अद्याप सुरू असून पूर्ण व्हायचे आहे, मात्र त्यापुर्वीच महामंडळाने अपंगाना प्रवासात असलेली सवलत नवे प्रमाणपत्र नाही असे कारण दाखवत नाकारण्यास सुरूवात केली.
अपंगांना प्रवासात मिळत असलेली सवलतच यामुळे बंद झाली. आमदार कडू यांनी महामंडळाला याबाबत कळवले व हा नियम बंद करण्याची मागणी केली. जिल्हा रुग्णालयांकडून अपंगांना नव्या संगणक प्रणालीचे प्रमाणपत्र देण्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जुन्या प्रमाणपत्रावरही प्रवास सवलत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी ती मान्य केली असल्याचे आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांनी कळवले आहे.