घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या राज्यातील ५५ वर्षांवरील घरेलू कामगारांना १० हजार रुपये सन्मानधन देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात एका कार्यक्रमात सन्मानधन वाटपाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेले आणि १ ऑगस्ट २०१३ रोजी ५५ वष्रे पूर्ण करणारे घरेलू कामगार या सन्मानधनासाठी पात्र असतील. राज्यात सुमारे दोन लाख १३ हजार घरेलू कामगार नोंदणीकृत असून त्यापकी सुमारे नऊ हजार १०९ कामगार ५५ वर्षांवरील आहेत. या नऊ हजार १०९ कामगारांना सन्मानधन वितरीत केले जाणार आहे. यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
  येत्या शुक्रवारी पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडिमटन हॉल, म्हाळुंगे बालेवाडी, येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानधन वाटपाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील उर्वरीत भागात कामगार आयुक्तालयाच्या स्थानिक जिल्हा कार्यालयामार्फत सन्मानधनाचे वितरण केले जाणार आहे. संबंधित घरेलू कामगाराच्या बँक खात्यावर किंवा धनादेशाद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे.