मुलीने मारहाण केल्याचाही दावा
वयोवृद्ध विधवा आईला (७४ वर्षे) तिच्याच मुलीने घराबाहेर काढल्याने पोलीस, स्वयंसेवी संस्था प्रसारमाध्यमांकडे न्याय मागण्यासाठी तिला वणवण भटकंती करावी लागत आहे. राधा कैलासप्रसाद तिवारी असे या वृद्धेचे नाव आहे.
राधा तिवारी यांच्या मते, गांधीनगरात त्यांचे दुमजली घर आहे. घराच्या वाटण्या झाल्या असून दोन दीर आणि जावा त्या ठिकाणी राहतात. त्यांच्या वाटय़ाला तीन खोल्या आल्या. त्यावर आणखी दोन खोल्या मुलीने बांधल्या. मात्र मुलीने मारहाण केल्याने घरातून बाहेर पडावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पतीच्या निधनानंतर त्यांना चार हजार रुपये पेंशन मिळते. मुलीने घरातून बाहेर काढल्यानंतर भाडय़ाने खोली घेऊन राहण्याची वेळ आली आहे. घरभाडे, औषधोपचार, खाणेपिणे आणि कामासाठी एखाद्या महिलेवर अवलंबून राहावे लागते. चार हजार रुपयांमध्ये ही सर्व तडजोड अगदीच अशक्य आहे. घर मालकीचे असताना वंचित ठेवले गेल्याने त्यांची वणवण सुरू आहे. मुलीने त्यांच्या मालमत्तेवर ताबा केल्याचे राधा तिवारी यांनी सांगितले.
मुलीने घरातून हाकलून दिले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला, यासंदर्भात  अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे राधा तिवारी म्हणाल्या. पोलिसांनी कुटुंबीयांना समजून सांगितल्यावरही त्यांना तेथून जाण्यास भाग पडले. गांधीनगरात दिसल्यास अपघात घडवून आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी नागपूर महापालिका आणि समाजकल्याण विभागाद्वारे प्रायोजित संतोषी बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या समुपदेशन केंद्राकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार संस्थेने त्यांची मुलगी आणि नातवाची जबानी नोंदवली. त्यानुसार मुलगी व मुलाने गेल्या जानेवारीत घरात दोन खोल्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे समुपदेशक राधा तिवारींना घेऊन त्या खोल्यांमध्ये राहण्यास गेल्या. मात्र, कुटुंबीयांनी त्यांना खोलीत प्रवेश करण्यास साफ मनाई केली. समुपदेशकांच्या मते, राधा तिवारींची बाजू बरोबर आहे. त्यांच्या मुलीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी आहेत.
यासंदर्भात राधा तिवारींचा नातू शैलेंद्र म्हणाला, आजीने आठ- दहा वर्षांपूर्वी गांधीनगरातील घरातून काढता पाय घेतला. त्यावेळी जो काही पैसा होता तोही ती घेऊन गेली. गांधीनगरातील दुमजली घराच्या तळमजल्यावर आजीचे नातेवाईक राहतात. वर आम्ही राहतो. त्यामध्ये दहा बाय दहा आणि दहा बाय बाराच्या दोन खोल्या आणि एक छोटे स्वयंपाक घर आहे. या वयात आजीने आमच्यात राहावे अशी अपेक्षा आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करायला आम्ही तयार आहोत. एवढय़ा छोटय़ा घरात भिंत टाकून आम्ही चार-पाच सदस्यांनी कसे राहायच? आम्ही लहान आहोत, आमच्या काही चुका झाल्या असतील, पण मोठेपणा दाखवायचा सोडून आजी पोलिसांकडे, समुपदेशन केंद्राकडे तर कधी वर्तमानपत्रांकडे धाव घेते.