ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या वेळी सावळा ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी आपल्या गावचे सरपंचपद उच्चशिक्षित डॉ. अविनाश गाताडे यांच्याकडे सोपवून एक नवीन पायंडा पाडला. आजतागायत तालुक्यामधील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर राजकीय नेत्यांच्या घरी रोज हजेरी लावणाऱ्यांची वर्णी लावण्याची अलिखित प्रथा पनवेलच्या राजकीय पक्षांमध्ये पडली होती. शेतकरी कामगार पक्षाने प्रस्थापितांच्या या प्रथेला छेद देत उच्चशिक्षित तरुणाकडे गावचे सरपंचपद देऊन तालुक्यातील राजकारणाला सुशिक्षितपणा देण्याचा प्रयत्न केला आहे.डॉ. अविनाश गाताडे यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी डॉ. गाताडे यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. डॉ. अविनाश गाताडे यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयातून २०११ साली डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. ९ सदस्यांच्या सावळे ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे सव्वाकोटी रुपये आहे. गावाला अपुरा होणारा पाणीपुरवठा ही मुख्य समस्या आहे. डॉ. गाताडे यांच्यासह गावामध्ये राहणारे डॉ. पी. एच. मते आणि डॉ. सुनील पाटील हे सुद्धा उच्चशिक्षित आहेत. डॉ. गाताडे यांनी रसायनी येथील एचओसी विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पनवेलच्या एम.एस्सी. महाविद्यालयीन व मुंबई पोर्ट येथील महाविद्यालयातून एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या डॉ. गाताडे पिल्लई महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत.सुमारे १६०० लोकसंख्या असलेल्या सावळे गावामध्ये पाणीटंचाई या सामाजिक समस्या आहे, ही समस्या सोडविण्यासाठी डॉ. गाताडे प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे गाव सध्या एमआयडीसीच्या पाण्यावर आपली तहान भागवते.गावापासून जवळच्या उसरन धरणातून सावळा गावासह पंचक्रोशीमधील इतर गावांना पाणी मिळावे आणि त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारावे यासाठी डॉ. गाताडे प्रयत्न करणार आहेत. तसेच या गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी १९६६ साली औद्योगिक कारणासाठी संपादन केल्यात, परंतु त्या अजून विकसित न केल्याने संबंधित शेतकऱ्यांसाठी सरकारदरबारी ते प्रयत्न करणार आहेत. गावातील तरुणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा आणि वाचनालयासह येथील शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी गाताडे प्रयत्नशील राहणार आहेत.डॉ. गाताडे यांच्या मते सर्वच राजकीय पक्षाने शेकापसारखी भूमिका अवलंबीत सुशिक्षित तरुणांना राजकारणाची दारे उघडली पाहिजेत, असे आवाहन केले. गावात पाणी आणण्यासाठी धडपड करणारे आणि गावातील विद्यार्थ्यांपर्यंत ई-लर्निगशी जोडली जावीत तसेच सरकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी याच ध्येयाने झसरपंचपदाची सूत्रे उच्चशिक्षिताकडे पाटून डॉ. गाताडे या क्षेत्रात आले आहेत.
First Published on September 1, 2015 5:43 am