डॉ. घोरपडेंची जवसावरील संशोधनात भर
आज बालकवी असते तर त्यांनी गवताऐवजी जवसावर कविता लिहून त्याचे महत्त्व विशद केले असते. अर्थात, जवसावरील कविता त्यांनी मनोरंजनासाठी नव्हे, तर जवसाचे आरोग्यदायी महत्त्व पटवून देण्यासाठीच केले असते. असो, आज आपल्यात बालकवी नसले तरी जवस आहे. जवसाचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही समाजात त्याविषयी फारशी जागरुकता मात्र नाही. जवसावरील संशोधनात भर घालणारे, जवसाचे नवीन वाण निर्मिती करून शेतावर त्याचे प्रयोग करणारे डॉ. पी.बी. घोरपडे यांची या क्षेत्रातील तपश्चर्या नेत्रदीपक अशी आहे.
जवसाचे महत्त्व वाढण्यामागे ओमेगा-३ हे अत्यावश्यक मेदाम्ल (फॅटी अ‍ॅसिड) कारणीभूत ठरले आहे. शरीराला प्रथिने, जीवनसत्त्व, स्निग्ध पदार्थाची जशी गरज आहे तशीच किंबहुना, त्यापेक्षा जास्त ओमेगा-३ हे मेदाम्ल अत्यावश्यक आहे. कारण, त्याचा संबंध आपल्या मेंदूशी आहे. मानवी मेंदूचा ६० टक्के भाग ओमेगा-३ ने बनलेला आहे. गर्भवतींना कॅल्शिअम, फॉलिक अ‍ॅसिड आणि इतरही महत्त्वाचे घटक गोळ्यांच्या मार्फत डॉक्टर देत असतात. आईला ओमेगा-३ चीही तेवढीच आवश्यकता असते. कारण, पोटातील बाळाला ओमेगा-३ न मिळाल्यास आईच्या शरीरातून ओमेगा-३ काढून घेतले जाते. कारण, प्राधान्य बाळाच्या जगण्याला, त्याच्या मेंदूच्या वाढीला दिले जाते. यावरूनच ओमेगा-३ चे महत्त्व लक्षात येते. एवढे आवश्यक मेदाम्ल आपल्या शरीरात निर्माण होत नाही तर ते बाहेरून खावे लागते.
गेल्या ४० वर्षांपासून आपण जे अन्न खातो, त्यात अजिबातच ओमेगा-३ हेही तेवढेच खरे आहे. एकीकडे रोजच्या अन्नपदार्थामध्ये त्याचा लवलेशही नसणे आणि दुसरीकडे शरीराला ते अत्यावश्यकही आहे. बदाम, आक्रोड, मासे यांच्यापाठोपाठ जवसात सर्वात जास्त ओमेगा-३ आढळून आले आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये संशोधनाच्या माध्यमातून जवसाचे महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने अधोरेखित झाले आहे. नागपुरातच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वयित तेलबिया संशोधन प्रकल्पांतर्गत तीळ, मोहरीबरोबरच जवसावर गेल्या सात-आठ वर्षांपासून संशोधन सुरू आहे. देशभरात असे १४ केंद्रे असून महाराष्ट्रातील एकमेव केंद्र नागपुरात आहे. जवसावरील संशोधनात भर घालणारे, जवसाचे नवीन वाण निर्मिती करून शेतावर त्याचे प्रयोग करणारे डॉ. पी.बी. घोरपडे यांची या क्षेत्रातील तपश्चर्या नेत्रदीपक अशी आहे. वरील संशोधन प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर असताना डॉ. घोरपडे यांनी जबाबदारी स्वीकारून जवसावरील संशोधनाला एक नवीन उभारी दिली. त्यातच त्यांना ३१ कोटींचे अनुदान जागतिक बँकेकडून मिळाल्याने त्यांचे संशोधन फाईलबंद न राहता शेतकऱ्यांमध्ये मिसळून त्यांनी जवसाची लागवड केली. याविषयी सविस्तरपणे पुढच्या भागात येईल.
जवसाचे महत्त्व सांगताना डॉ. घोरपडे म्हणाले, ओमेगा-३ हे मेंदूचे ‘हार्डवेअर’ आहे. ज्या मुलांना हे मेदाम्ल योग्य वयात मिळते, अशी मुले हुशार बनतात. बंगाली, कोकणी, दाक्षिणात्य लोकांची हुशारी त्यामुळेच झळकते. कारण, ते मासे खातात. माशांमध्ये ओमेगा-३ आहे. मात्र, त्याचे प्रमाण जेमतेम अर्धा टक्के आहे. हल्ली त्यातही पारा हा धातू सापडत असल्याने शरीराला घाण पाण्यातील मासे खाणे घातक होऊन बसले आहे. बदाम, आक्रोड, ऑलिव्ह ऑईलमध्येही ओमेगा-३ आहे. बदाम व ऑक्रोडमध्ये त्याचे प्रमाण ०.०१ टक्के असल्याने ते किती खाणार आणि १२०० रुपये किलो ऑलिव्ह ऑईल खाणे कोणाला परवडणार? त्यापेक्षा ५८ टक्के ओमेगा-३ असलेले जवस का खाऊ नये? मात्र, जवसाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे नाही, तर ते कच्चेच खाणे योग्य. चटणीवर, पोळीवर, सलादवर थंड तेल घेऊन ते खावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.