येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या दि. २४ ला पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा शिर्डी येथे आयोजित क रण्यात आला आहे. पक्षाचे तालुकाप्रमुख कमलाकर कोते यांनी ही माहिती दिली.
मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक झाली. येत्या दि २४ ला दुपारी ३ वाजता ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तालुका प्रमुखांपासून बुथ प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. खासदार वाकचौरे, सांमत व जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली. भागवत मुंगसे,बाबासाहेब मुसमाडे, शेखर बोऱ्हाडे, सर्जेराव घाटगे, देवीदास सोनवणे, मच्छिंद्र धुमाळ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.