‘एका वरचढ एक’ या कौटुंबिक सिनेमाचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन राजेश पाटोळे यांची सुरुवात ‘सूर्योदय एक नवी पहाट’ या सिनेमाचे छायालेखक म्हणून झाली. त्यानंतर ‘सख्खा सावत्र’, ‘प्रतिबिंब’ आणि आता ‘एका वरचढ एक’ अशा चित्रपटांचे छायालेखन आणि दिग्दर्शन केले.
‘एका वरचढ एक’ या सिनेमाविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की मी एका कौटुंबिक, पण विनोदी कथेच्या शोधात होतो. ज्या कथेमधून समाजासाठी काहीतरी वेगळा संदेश देता येईल का असा विचार होता. आजचे युग हे आधुनिक विचारांचे युग आहे. या युगामध्ये संस्कृती काही प्रमाणात बिघडत चाललेली आहे आणि त्या विषयावर काही चांगला विचार सांगता येईल का, या विचारात असताना ‘एका वरचढ एक’ ही कथा वाचायला मिळाली. ही कथा प्रेक्षकांना नक्की आवडेल असे वाटले आणि म्हणून या कथेवर चित्रपट करण्याचे ठरविले.
ही एक विनोदी कथा आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या असतातच. पती आणि पत्नी या दोघांमधला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. सुख आणि दु:ख हे येतच असते.
या पती आणि पत्नी यांच्या आयुष्यात एक छोटीशी घटना सिनेमात घडते आणि त्यांच्या जीवनात वादळाचे काहूर माजते, पुढे हे वादळ शांत होते. असे सारे ‘एका वरचढ एक’ या सिनेमात पाहायला मिळेल. ही मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे.
या सिनेमात मििलद गवळी, तन्वी काळे, चेतन दळवी, उज्ज्वला गायकवाड, मंगेश देसाई, गौरी कदम, कुशल बद्रिके, दीपाली कंकाळ आणि विजय चव्हाण असे कलाकार आहेत. अनेक नवीन कलाकारांना संधी देण्यात आलेली आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
या सिनेमात तीन गाणी असून ही गाणी दीपक गायकवाड यांनी लिहिली असून, संगीत मनोज टिकारिया यांचे लाभले आहे. ही गाणी शब्बीर कुमार, डॉ. नेहा राजपाल, उदित नारायण, साधना सरगम यांनी गायलेली आहेत. या सिनेमाची निर्मिती चिराग पब्लिसिटीची असून, छायाचित्रण आणि दिग्दर्शन राजेश पाटोळे यांनी सांभाळले आहे. सिनेमासाठी हाय डेफिनेशनचे तंत्रज्ञान वापरले आहे, असे राजेश पाटोळे यांनी सांगितले. ३० नोव्हेंबर रोजी ‘एका वरचढ एक’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.