08 March 2021

News Flash

पवारांच्या प्रस्तावित विदर्भ दौऱ्याला निवडणुकांची जोड

पुरामुळे सर्वाधिक हानी झालेल्या जिल्ह्य़ांना भेटी देण्याचे टाळत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांचा होत असलेला विदर्भ दौरा पूरग्रस्त

| September 11, 2013 02:21 am

पुरामुळे सर्वाधिक हानी झालेल्या जिल्ह्य़ांना भेटी देण्याचे टाळत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांचा होत असलेला विदर्भ दौरा पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे की, आगामी निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळजवळ बुडाल्यात जमा आहे. हजारो हेक्टरमधील पीक वाहून गेल्याने बळीराजा अस्वस्थ आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने १८०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्यातून मिळणारी मदत अतिशय अपुरी आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्राकडून आणखी मदत मागितली आहे. या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या पवारांच्या दौऱ्याकडे शेतकरी आशेने बघत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. पवार येत्या १४ ते १६ सप्टेंबर या काळात विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व भंडारा या सहा जिल्हय़ांना भेटी देणार आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती बघण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला, असे राष्ट्रवादीच्या वर्तुळातून सांगण्यात येत असले तरी या दौऱ्यासाठी पवारांनी केलेली जिल्हय़ांची निवड अनेकांना बुचकाळय़ात टाकणारी आहे.
विदर्भात यंदा सर्वाधिक पाऊस पडला असला तरी अकोला, वाशीम या भागांत पिकांची हानी फारशी झालेली नाही. यवतमाळ जिल्हय़ातील केवळ काही तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्हय़ांत मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. ही स्थिती सर्वाना ठावूक असताना पवारांनी अकोला, वाशीम व यवतमाळची निवड का केली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विदर्भात पिकांची सर्वाधिक हानी चंद्रपूर जिल्हय़ात झाली आहे. या जिल्हय़ातील शेतकऱ्यांना २३३ कोटींची मदत देण्यात यावी, असा प्रशासनाचाच प्रस्ताव आहे. चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली जिल्हय़ाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही जिल्हय़ांना पवारांच्या दौऱ्यातून वगळण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. भंडारा, गोंदियात प्रफुल्ल पटेल आहेत. वाशिम व वध्र्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर अकोला व यवतमाळवर राष्ट्रवादीची नजर आहे. हेच धोरण ठेवून पवारांच्या या दौऱ्याची आखणी करण्यात आली असावी, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हय़ांत राष्ट्रवादीची अवस्था अतिशय वाईट आहे. चंद्रपुरात तर गटबाजीला उधाण आले आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाची कामगिरी क्षीण होत आहे. गडचिरोलीत अशीच गटबाजी आहे. त्याचा परिणाम कामगिरीवर झाला आहे. या स्थितीची कल्पना असल्यानेच पवारांनी सर्वाधिक हानी होऊन सुध्दा या जिल्हय़ात येण्याचे टाळले असावे, असा तर्क आता राजकीय वर्तुळात मांडला जात आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर राजकारण डोळय़ांसमोर ठेवून पवारांचा हा दौरा ठरवण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीला मदत करा तेव्हाच मोठे साहेब लक्ष देतील, असे या पक्षाच्या नेत्यांना सूचवायचे आहे काय असा सवालही उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:21 am

Web Title: on face of election sharad pawar organises vidarbha tour
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा विदर्भवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला
2 वेगळेपण जपण्याचा गणेशमंडळांचा वसा..
3 अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे सणासुदीच्या उत्साहावर विरजण
Just Now!
X