सोलापूर शहर व जिल्हय़ातील बहुतांशी भागात परतीच्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पुनश्च पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. शुक्रवारी दुपारी आकाशात ढगांनी प्रचंड गर्दी केल्यानंतर त्या पाठोपाठ पावसाला प्रारंभ झाला. बराच वेळ पडणाऱ्या या पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण दिसून आले.
दिवाळीच्या तोंडावर पडणाऱ्या या पावसामुळे बाजारपेठांमध्ये धांदल उडत असून, व्यापारीही पावसाने आता निरोप घ्यावा म्हणून प्रार्थना करीत आहेत. गेल्या मंगळवारपासून शहर व परिसरात पावसाने पुन्हा तोंड वर काढले आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३०पर्यंत ७.४० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे हवामान बदलून गेले असून, यात विविध आजार उद्भवण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या पावसाळय़ात १ जून ते ३० सप्टेंबपर्यंत जिल्हय़ात १०२.२४ टक्के इतका समाधानकारक पाऊस पडला होता. त्यानंतर चालू ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत जिल्हय़ात सरासरी २७.७२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.