17 November 2017

News Flash

पिसाचा मनोरा : माऊ

टेबलावरची सॅक पाठीला अडकवत मन्या तिरमिरीनं बाहेर पडला.. ‘आजचं नाटक जरा जास्तच लांबलं..’ बसच्या

मुक्ता | Updated: February 12, 2013 12:09 PM

टेबलावरची सॅक पाठीला अडकवत मन्या तिरमिरीनं बाहेर पडला.. ‘आजचं नाटक जरा जास्तच लांबलं..’ बसच्या रांगेत उभं राहताना त्याला वाटलं. डिग्रीनंतर हट्टाने मास्टर्स करतोय.. ‘त्यापेक्षा, नोकरी मिळेल, असं काहीतरी शिक,’ असा खवचट सूर बाबांनी लावल्यापासून घरातलं वातावरणच  डचमळलंय. कुणी पैशावरून काही बोललं की ते मलाच उद्देशून बोलतायंत, असंच वाटतं. जबाबदाऱ्या नकोत, म्हणून आपण शिक्षण लांबवतोय का? या विचाराने गिल्टी वाटतं..
.. आज मेंदू जरा अधिकच सिरीयसली काम करतोय, असं वाटल्याने त्याने पुढचे विचार झटकले. युनिव्हर्सिटीच्या कोपऱ्यावरच्या टपरीवर कटिंग घेतलं की, डोक्यातलं वादळ निमेल, याची त्याला खात्री होती. स्टॉपवर कुणी ओळखीचं दिसतंय का, ते तो न्याहाळू लागला.
समोरच्या स्टॉपवर ‘व्हॅलेन्टाइन’निमित्त ‘तुमच्या प्रिय व्यक्तीला द्या, अक्षय्य आनंदाचा ठेवा.. ’ अशी काहीशी अ‍ॅड झळकली होती. खरेदीवर किती सवलत मिळेल वगैरे मजकूर होता त्यात. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी एवढं महागडं गिफ्ट द्यायचं? आणि मग इतकं महागडं द्यायचं तर मग इतकीशी सवलत कशाला? असं काही महागडं देणं म्हणजे प्रेम असल्या समजुती जपणाऱ्या देणाऱ्या-घेणाऱ्यासाठी त्याने मनातल्या मनात देवाकडे करुणा भाकली आणि बसचं तिकिट काढायला खिशातली २० रुपयाची नोट चाचपली.
‘आपला स्ट्रगल पिरियड अजून सुरू व्हायचाय.. पण त्याआधीच आपण अस्वस्थ बनलोय.. तरी बरं, प्रेमप्रकरण वगैरे काही नाही. इथे आपलेच मूड आपल्याला सांभाळता येत नाहीत, त्यात त्या मुलीचे मूड कुठे सांभाळणार?’ हे विचार बाजूला सारता-सारता त्याला माऊ आठवली आणि कुणास ठाऊक, त्याला उगाचच एकटं, रिकामं वाटलं.. तशी तिची आठवण येण्याचं आज काही कारण नाहीय, पण अजून आपलीच सवय जात नाही.. काहीही बिनसलं तरी ती गोष्ट तिच्यापर्यंत नेऊन आपण थांबतो. का, याचं उत्तर सापडत नाहीय. हो, पण तिची आठवण आली की पोटात खड्डा पडल्यासारखा होतो.. अंगावर येणाऱ्या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी तो भोवतालच्या गर्दीत मिसळू लागला..

First Published on February 12, 2013 12:09 pm

Web Title: on the occasion of valentines day