चार ध्येयवेडय़ा डॉक्टरांच्या ध्यासातून १९६६ साली लातूर येथे स्वामी विवेकानंद जयंतीला विवेकानंद रुग्णालय सुरू करण्यात आले. अनेक खडतर प्रसंगातून वाटचाल करीत रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील ध्येयप्रेरित संघटित यशस्वी प्रयोगाची अनुभवसिद्ध कहाणी डॉ. अशोक कुकडे यांनी ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केली आहे. स्वामी विवेकानंद सार्धशती वर्षांत या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, २ मार्च रोजी करण्यात येत आहे. या पुस्तक प्रकाशनाबरोबरच डॉ. अशोक कुकडे उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संयज ओक त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. कुकडे लिखित पुस्तकाला ‘सर्च’चे प्रमुख डॉ. अभय बंग यांची प्रस्तावना लाभली असून हा कार्यक्रम शनिवारी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमीचे मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाटय़ मंदिर संकुल, प्रभादेवी येथे होणार आहे.
‘पार्ले कट्टा’मध्ये सत्यजित भटकळ  
‘झोकोमॉन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच ‘लगान’ या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटाच्या ‘मेकिंग’बद्दल ‘चले चलो : द ल्यूनसी ऑफ फिल्म मेकिंग’ हा माहितीपट बनविणारे दिग्दर्शक सत्यजित भटकळ शनिवार, २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात येऊन रसिकांशी संवाद साधणार आहेत.
‘लगान’ चित्रपटाच्या निर्मितीत सहाय्यक म्हणून काम करताना त्यांना ‘मेकिंग ऑफ लगान’ बनविण्याची कल्पना सुचली होती. एवढेच नव्हे तर माहितीपटाबरोबरच सत्यजित भटकळ यांनी ‘द स्पिरीट ऑफ लगान’ हे पुस्तकही लिहिले. त्यानंतर ‘सत्यमेव जयते’ या रिअ‍ॅलिटी शोचे संकल्पना आणि दिग्दर्शन करून भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्रात सत्यजित भटकळ यांनी इतिहास घडविला. रिअ‍ॅलिटी शोद्वारे देशवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. सत्यजित भटकळ मनमोकळ्या संवादातून सांगणार आहेत. डॉ. शशिकांत वैद्य सत्यजित आणि स्वाती भटकळ यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या  सहदिग्दर्शक व सत्यजित यांच्या पत्नी स्वाती चक्रवर्ती-भटकळ यासुद्धा सहभागी होणार आहेत.  ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात मुख्य कार्यक्रमापूर्वी मुक्त व्यासपीठ हा उपक्रमही चालविला जातो. मुक्त व्यासपीठमध्ये मोबाईल टॉवर आरोग्याला घातक या विषयावर सुप्रसिद्ध निवेदिका नीला रवींद्र श्रोत्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अतिशय मोलाची माहिती देणार आहेत.  अधिक माहितीसाठी रत्नप्रभा महाजन (९९३०४४८०८०) यांच्याशी संपर्क साधावा.
समूह चित्रप्रदर्शन   
अपरिमिता सप्रू, गुलरेज अली, ममता व्होरा आणि डिम्पल वासा अशा चार कलावंतांच्या कलाकृतींचे एकत्रित प्रदर्शन ‘आमाल्गमेशन’ सध्या केम्प्स कॉर्नर येथील आर्ट फ्लोअर कला दालनात भरविण्यात आले आहे. रसिकांना खिळवून ठेवतील अशा कलाकृती ममता व्होरा यांनी कॅन्व्हासवर चितारल्या असून बिंदू ही त्यांच्या चित्रांची संकल्पना आहे. डिम्पल वासा यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून पेन आणि शाईचा वापर करून अपरिमिता सप्रू यांनी चित्रे काढली आहेत. गुलरेज अली यांची चित्रेही अमूर्त शैलीतील आहेत. ४ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन आर्ट फ्लोअर, तारापोरवाला बिल्डिंग नं. १, तळ मजला, गोवालिया टँक रोड, कम्बाला हिल रुग्णालयासमोर, केम्प्स कॉर्नर येथे पाहायला मिळेल.
महिला संगीत संमेलन
ख्याल ट्रस्ट आणि कलाभारती या संस्थांच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त २ आणि ३ मार्च रोजी कर्नाटक संघ सभागृहात महिला संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता आणि रविवारी सकाळी १० वाजता अशा दोन सत्रांत हे संमेलन होणार आहे. यामध्ये ‘स्वरभास्कर’ पुरस्कार विजेत्या गौरी पाठारे, अहमदाबादच्या मंजू मेहता यांचे गायन ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर नीला भागवत यांच्या संकल्पनेवर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमात राधिका सूद नायक, सोमा सेन, रेश्मा गीध, कोकिला, भावना, मनिषा कुलकर्णी गाणी सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शानभाग, लता वेंकटरामन करणार आहेत. मुक्ता रास्ते, संजीवनी हसबनीस, हेतल मेहता जोशी, सुप्रिया जोशी हे कलाकार तबला आणि हार्मोनियमवर साथसंगत करणार आहेत. सर्व महिला कलावंत सहभागी होत असलेल्या या संमेलनात ‘मराठी कथेतील स्त्री प्रतिमा’ या विषयावर डॉ. वंदना बोकील कुलकर्णी दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क – ९९२०२२३७९३.
रंगरेषा’ महोत्सवाचे आयोजन
‘गद्रे बंधू’ आणि ‘जोत्स्ना प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘रंगरेषा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते १२ या वेळेत लोकसत्ताचे चित्रकार निलेश जाधव स्लाइड शोसहित प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर व्यक्तिचित्रणाचा कार्यक्रम प्रात्यक्षिकासह सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८३३१८१७३५
टॉम ऑल्टरची तीन नाटके
अमेरिकन मूळ असलेले भारतीय ज्येष्ठ अभिनेता टॉम ऑल्टर यांची मोठय़ा पडद्याबरोबरच रंगभूमीवरील कारकीर्दही महत्त्वाची आहे. हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले टॉम ऑल्टर यांची तीन नाटके लागोपाठ तीन दिवस नरिमन पॉईण्ट येथील यशवंतरा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पाहायला मिळतील. १ ते ३ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ७  वाजता ‘नायब – थ्री रेअर प्लेज’ या शीर्षकाकाली सलग तीन दिवस ‘के एल सैगल’ , ‘लाल किले का आखरी मुशायरा’ आणि ‘गालिब के खत’ अशा तीन नाटकांचे एकेक प्रयोग रंगणार आहेत. डॉ. एम सय्यद आलम यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या नाटकांचे प्रयोग युसूफ व फरीदा हमीद फाऊण्डेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.
एनसीपीए ‘लिव्हिंग ट्रॅडिशन्स’
देशातील विविध राज्यांची संस्कृती, लोकपरंपरा लोकांसमोर यावी या उद्देशाने एनसीपीएतर्फे ‘लिव्हिंग ट्रॅडिशन्स’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी १ व २ मार्च राजस्थानची लोकपरंपरा, लोकगीते, लोककथा विविध कार्यक्रमांद्वारे लोकांसमोर आणली जाणार आहे. सिंध सारंगी, कमायचा, मुरली यांसारखी राजस्थानी पारंपरिक वाद्यांचे संगीत ऐकण्याबरोबरच विविध लोककथा, लोकगीते, लोकनृत्यांचे सादरीकरण पाहण्याची संधी मिळणार आहे.  अस्सल राजस्थानी संगीतकार जोधपूरहून या कार्यक्रमासाठी येणार असून लोकसंगीताची समृद्ध परंपरा, लोककथा याद्वारे राजस्थानी जीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.