बुधवारी मनपाने नेहमीप्रमाणे शहरातील मुख्य वर्दळीच्या भागातील अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला. गांधी चौक, सिटी कोतवाली व हुतात्मा धिंग्रा चौकातील अतिक्रमण मनपाने हटविले. यावेळी काही ठिकाणी वादाचे प्रसंग ओढवले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पुन्हा भेदभावपूर्ण कारवाई केल्याचे आरोप अतिक्रमण काढण्यात आलेल्यांनी केले.
वास्तविक, त्यांच्या या आरोपात तथ्य आहे. कारण, मनपातील लोकांच्या खास मर्जीतल्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाला हात लावला जात नाही, असे दरवेळी घडते तसे आजही घडले असल्याचा काहींचा आरोप आहे.     गांधी मार्ग, कोतवाली, धिंग्रा चौक हे तर वर्दळीचे रस्ते आहेतच. यावर मुख्य बाजारपेठ आहे. ज्वेलरीच्या मोठ मोठय़ा दुकानांपासून तर पाणीपुरीच्या दुकानापर्यंत सारी दुकाने याच भागात जास्त प्रमाणात आहेत. म्हणून येथे राबता प्रचंड आहे. त्यातच वाहनांची भर पडल्याने हा मार्ग अधिकच गर्दीचा होतो. मनपाच्या पथकाने जेसीबी मशिनसह व आपल्या ट्रक्ससह हे अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला. पोलिसांची कुमक त्यांच्या दिमतीला होती.
 शहरातील प्रत्येक मार्गावर अतिक्रमण मोठय़ा प्रमाणावर झाले असून या अतिक्रमणाचा त्रास वाहनधारकांना, तसेच पायी चालणाऱ्यांनाही होतो, पण मनपा अथवा महसूल अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने ते आता अक्राळविक्राळ झाले आहे. मनपाने आता पुन्हा अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला आहे. ही बाब नेहमीची झाली असून आता हटविलेले अतिक्रमण काही दिवसांनी पुन्हा तेथेच व अन्यत्र कायम होते. यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी मनपाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी कायमचा तोडगा काढणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील अनेक भागातील अतिक्रमणांना नगरसेवकांचे संरक्षण असल्याचे सांगण्यात येते, तर अनेक ठिकाणी मनपाच्या अधिकाऱ्यांच्याच संबंधितांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्या घटकांना संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोप दरवेळी होतो. रस्त्यावरील अतिक्रमणे नुसते हटवून चालणार नाही, तर मोठमोठी संकुले सुद्धा अतिक्रमणात येत असतील तर त्यावरही मनपाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याआधी मनपा आयुक्त शर्मा यांनी तुकाराम चौकातील एका भव्य अशा मंगल कार्यालयाचे जवळपास १२ फूट पुढे आलेले अतिक्रमण पाडण्यास भाग पाडले होते. तशीच कारवाई अकोलेकरांना अभिप्रेत आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभी ठाकलेली अतिक्रमणे तोडण्याची हिंमत मनपाच्या या चमुची होत नाही. राजकीय नेते हस्तक्षेप करून त्यास वाचवितात, असे मनपातील काही सूत्रांचे म्हणणे आहे. आता गौरक्षण मार्गावरील नेहरू पार्कजवळ व आसपासच्या भागात अतिक्रमण होऊ घातले आहे. सध्या ते तात्पुरते असले तरी काही दिवसांनी ते कायम होऊन या वर्दळीच्या मार्गावर अडचणी निर्माण होऊ शकतात, याकडे सुद्धा मनपाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.