राज्यातील महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराला होत असलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनीही पुन्हा एकदा या कराविरुद्ध कंबर कसली आहे. रविवारी, नागपूर येथे व्यापाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर काहीच तोडगा न निघाल्याने आता उद्या ८ मे रोजी होणारा चंद्रपूर शहर बंद पुकारला आहे. उद्या बुधवारी येथील पेट्रोलपंपासह संपूर्ण बाजारपेठही बंद राहणार आहे.
एलबीटीच्या विरोधात मुंबई, नागपूरसह राज्यातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. एलबीटीविरोधात आणि बंदच्या समर्थनार्थ चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर नगरपालिकेची महानगरपालिका झाली. लगेच अन्य महानगरांप्रमाणे चंद्रपुरातही एलबीटी लावण्यात आला. या कराला येथील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध झाला. पण, त्यांच्या विरोधाला सरकार जुमानत नव्हते. आठवडाभर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद पाडली. जनतेलाही त्याची झळ पोहोचू लागली. अखेर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी व्यापाऱ्यांचे बोलणे करवून दिले. सविस्तर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. सहा महिने शहरात एलबीटी नव्हते. मात्र, नंतर सरकारने अन्य महानगरांप्रमाणे चंद्रपुरातही एलबीटी लागू केला. त्यानंतर मात्र नाईलाजाने आणि आंदोलनही थंड पडल्याने येथील व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली. एलबीटीच्या माध्यमातून मनपाला बऱ्यापैकी निधी मिळाला. पण, आता या एलबीटीला अन्य महानगरातही विरोध होऊ लागल्याने आणि चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे जाळे सर्वत्र असल्याने चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनीही पुन्हा एलबीटीविरोधात एल्गार पुकारला आहे. उद्या ८ मे रोजी महानगरातील पेट्रोलपंपांसह येथील बाजारपेठही बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता येथील जैन भवन परिसरात सर्व व्यापारी एकत्रित येणार असून तेथून मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.