२०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेवर येण्याची शक्यता असून त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक संधी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले आहे.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘मिशन लोकसभा २०१४’ या विषयावर भटेवरा बोलत होते. भटेवरा यांनी आजवर झालेल्या निवडणुका, राजकीय पक्षांमध्ये झालेली स्थित्यंतरे यांचा आढावा घेतला. १९९१ पासून लोकसभेतील मूल्यांचे पतन होऊ लागले. सध्याच्या लोकसभेत सर्वाधिक कमी कामकाज झाले. ‘लोकसभा मिशन’ केवळ राजकारण्यांपुरता मर्यादित न राहता सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत ते पोहोचायला हवे. सद्य:स्थितीत राजकारणाबद्दल लोकांमध्ये अतिशय घृणा असून भ्रष्टाचारही टिपेला पोहोचला आहे. पक्ष कोणताही असला तरी त्या सभागृहात चांगले काम करणारा प्रतिनिधी पाठविण्याचा प्रयत्न लोकांकडून होणे गरजेचे आहे, असे भटेवरा यांनी सांगितले.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारवर घोटाळ्यांसंदर्भात आरोप होत राहिले. राहुल गांधी यांची अवस्था ही पंख आहे, आभाळ आहे, पण उडण्याचे बळ नसलेल्या पक्ष्यासारखी आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपची स्थितीही निराशाजनक आहे. मोदींमध्ये नेतृत्व क्षमता असली तरी त्यांच्या प्रतिमेमुळे उत्तर विभागात फारसा प्रतिसाद त्यांना शक्य नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास उत्तम चालायचा. त्यातून देश समजायचा. आता त्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. राज्यकर्त्यांना लोकमानसाचे भान राहिलेले नाही.
आर्थिक उदारीकरणानंतर राजकारण्याच्या पतनाला सुरुवात झाली. यापुढे देशाच्या राजकारणाची पिढी बदलणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक संधी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची युती लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार असून, देशाच्या राजकारणात पाठिंबा मिळविण्याचे कौशल्य पवारांमध्ये आहे, असे निरीक्षणही भटेवरा यांनी नोंदविले.