लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीचा झालेल्या पराभवानंतर आता आगामी पदवीधर आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता सर्व गट एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा चिंतन बैठकीच्या निमित्ताने गटबाजी समोर आली आहे.
काँग्रेसने पराभवानंतर रविवारी राणी कोठी येथे पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत विचारविनिमय होण्यापेक्षा गटातटाच्या राजकारणावर जास्त चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांच्यासह इतरही लहान मोठे अनेक गट या पक्षात आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सर्व गट आपली शक्ती दाखविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चिंतन बैठकीच्या निमित्ताने या पक्षातील नेत्यांमधील गटबाजी समोर आली आहे. उत्तर नागपुरात डॉ. नितीन राऊत यांच्या विरोधात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच रोष व्यक्त करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. अनीस अहमद यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंची नाराजी असून ती निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांंनी बोलून दाखविली आहे.
रविवारी झालेल्या चिंतन बैठकीमध्ये वेगवेगळ्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी पराभवासाठी पक्ष संघटन जबाबदार असल्याचा आरोप केला तर काहींनी तळागळातील कार्यकर्त्यांंना विश्वासात घेतले नसल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप केला. या आरोप प्रत्यारोपामध्ये गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटातील नेत्यांचे कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे प्रत्येक नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी उघडपणे समोर आली नाही. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अजय पाटील यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेत शहरातील वेगवेगळ्या समस्या घेऊन आंदोलन, निदर्शने आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. मुळातच नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी नागपूरच्या राष्ट्रवादीची अवस्था असल्यामुळे कार्यकर्ते टिकवून ठेवणे ही मोठी समस्या आहे. आजपर्यंत विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तर शहरात किमान दोन जागा मिळाव्या, अशी अपेक्षा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघापैकी एकही जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येत नाही आणि जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी फक्त एक जागा राष्ट्रवादी लढवते. त्यामुळे कार्यकर्त्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी व्यतिरिक्त संधीच मिळत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही संधी सोडायची नाही म्हणून कार्यकर्ते कामाला लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये गटबाजी आहे आणि ती यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळे फारशी समोर आली नसली तरी यावेळी मात्र येण्याची शक्यता आहे. अजय पाटील कुणाला विश्वासात घेत नाही, असा आरोप पक्षाच्या काही युवा नेत्यांनी केल्यामुळे ही गटबाजी लवकरच समोर येण्याची चिन्हे आहेत.