शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या वतीने हरतऱ्हेने प्रयत्न करूनही रस्त्यावरील लूटमार आणि घरफोडय़ांचे प्रकार सुरूच असून पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमधून लाखो रूपयांची रोकड व ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे.
पंचवटी परिसरात रात्रीतून दोन ठिकाणी घरफोडीचे प्रकार झाले. फुलेनगर येथे मनपा शाळा क्र. ५६ मधील हजारो रूपये किंमतीचे क्रीडा साहित्य चोरून नेण्यात आले. या प्रकरणी मुख्याध्यापिका सुरेखा खैरनार यांनी तक्रार दिली आहे. पंचवटीतीलच शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळा नं. १५ मधील ब्लँकेटचा साठा, चप्पल-बूट, रेडिमेड कपडे असा सुमारे १७ हजार रूपयांचा ऐवज लांबविण्यात आला. भक्तीनगर येथील रियाज पापामियॉ शेख यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी दागिन्यांसह सुमारे दोन लाख रूपयांच्या ऐवजाची चोरी केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. असाच प्रकार सिडकोतील गोविंदनगर परिसरात घडला. नितीन ताजणे हे कामानिमित्त बाहेर गेले असता दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे ७३ हजारांचा ऐवज लांबविला. घरफोडीप्रमाणेच गुरूवारी मध्यरात्री एका प्राध्यापकाला रस्त्यात अडवून लुटण्यात आले. व्दारका परिसरातून रात्री अकराच्या सुमारास अंबेजोगई येथील प्रा. रामप्रभू तिडके हे पंचवटीकडे महामार्गाने पायी जात असता मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना कन्नमवार पुलाजवळ घेरले. त्यांना माहिती विचारत दमदाटी सुरू केली.
त्यांच्या जवळील दागिने, मोबाईल तसेच तीन हजार ५०० रूपये रोख हिसकावून घेत चोरटे पसार झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांच्या वतीने शहरात पुन्हा एकदा मोटरसायकल तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.