शहर बस सेवेवर पुन्हा एकदा बंदचे संकट आले आहे. ठेकेदार संस्था प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. यांनी वाढत्या तोटय़ाचे कारण देत पुन्हा एकदा महापालिकेला ही सेवा बंद करत असल्याची महिनाभराची नोटीस बजावली आहे.
शहरातील विनापरवाना अ‍ॅपे रिक्षांची वाढती अवैध प्रवासी वाहतूक ही सेवा तोटय़ात येण्याचे प्रमुख कारण आहे. यासंदर्भात मनपा काहीच हालचाल करत नाही. आरटीओ, वाहतूक शाखा यांच्यावर त्यांनी अवैध रिक्षांच्या विरोधात मोहिम चालवावी म्हणून मनपा कसलाही दबाव आणायला तयार नाही असा ठेकेदार संस्थेचा आरोप असून त्यात तथ्यच आहे. शहर हद्दीत आरटीओ कार्यालयाकडे फक्त ४५० अ‍ॅपे रिक्षांची नोंदणी झालेली आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात तब्बल ४ हजार अ‍ॅपे रिक्षा बिनधास्त व्यवसाय करत आहेत. त्यांच्यातील काही रिक्षांची नोंदणी ही पुणे, बीड, श्रीरामपूर व अन्य ठिकाणची आहे. मात्र तरीही ती वाहने येथे व्यवसाय करताना दिसतात. नियमाप्रमाणे ६ आसनी रिक्षांना शहर हद्दीत व्यवसाय करण्यास मनाई आहे. मात्र अनेक ६ आसनी रिक्षा सर्रास शहर हद्दीत प्रवासी वाहतूक करत असतात. ६ प्रवासी नेण्याचे बंधन असताना त्यात ८ ते १० व अनेकदा १२ प्रवासी बसलेले असतात. त्यामुळे महिला, युवती प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. पोलिसांच्या डोळ्यासमोर ही बेकायदेशीर वाहतूक होत असतानाही त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नाही. शहर बस सेवेच्या थांब्यांपासून १०० मीटर अंतरापर्यंत रिक्षांना थांबण्यास जिल्हाधिकाऱ्यांसमवेतच्या एका बैठकीत बंदी घालण्यात आली आहे. त्याचीही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शहर बस सेवेचा तोटा वाढत असून तो आता महिना ७५ लाख रूपये इतका मोठा झाला आहे.  मध्यंतरी डिझेलची दरवाढ झाली, त्यामुळे शहर बस सेवेलाही १ रूपयाची दरवाढ मंजूर झाली, मात्र त्याचवेळी अवैध प्रवासी वाहतुकीतही वाढ झाल्यामुळे शहर बस सेवेचा तोटा आहे तसाच आहे. शहर बस सेवेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, वाहतूक शाखा यांच्याकडे वारंवार अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात कारवाई करण्याबाबत आग्रह धरण्यात येतो, पण त्याला मर्यादा पडतात. महापौर तसेच अन्य पदाधिकारी व मनपा प्रशासनानेही यात शहर बस सेवेची साथ द्यायला हवी, मात्र तसे सहकार्य मिळत नाही, त्यामुळे नाईलाजास्तव १० एप्रिल २०१३ पासून शहर बस सेवा बंद करत असल्याचे ठेकेदार संस्थेने आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिलेल्या नोटीशीत म्हटले आहे.