हिंगोली जिल्ह्य़ाच्या अनेक भागात गुरुवारीही जोरदार पाऊस पडला. दुपारी दोन तास पडलेल्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. दुपारी दोन तास व संध्याकाळीही उशिरा पुन्हा जोरदार पावसाने जिल्ह्य़ाच्या अनेक भागात बरसात केली. दरम्यान, बुधवारी घडलेल्या घटनेत हिंगोली तालुक्यातील पहेणी शिवारात शेळ्या राखणारा लक्ष्मण नामदेव मस्के याचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात अवकाळी गारांचा पाऊस थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. जानेवारीत पावसामुळे पाचही तालुक्यांत कमी-अधिक नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. फेब्रुवारीतही पावसाने फळबागांचे व शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतरही दोन वेळा गारांचा पाऊस झाला. त्याची नोंद जाहीर झाली नाही. तसेच त्याचे पंचनामे झाल्याचेही दिसत नाही. बुधवारी हिंगोली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेळ्या चारणारा लक्ष्मण मस्के झाडाखाली थांबला असता झाडावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.