‘हिम्मतवाला’ चित्रपटाचे नाव घेतले की ‘ताथय्या ताथय्या’ म्हणत विविध रंगांची उधळण होत असताना तसेच रंगीबेरंगी कपडे घालून नाचणाऱ्या ‘जंपिंग जॅक’ जितेंद्र आणि श्रीदेवीची आठवण पहिले होते. आज इतकी वर्ष उलटली तरी हे गाणे लोकांच्या मनातून गेलेले नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या रिमेकचा विचार झाला तेव्हा त्यात हे गाणे घेणे निर्माता वाशू भगनानी आणि दिग्दर्शक साजिद खान दोघांसाठी आवश्यक झाले होते. नव्या चित्रपटात अजय देवगण आणि तमन्ना भाटिया यांच्यावर हे गाणे नुकतेच चित्रित करण्यात आले असून ताथैय्या..ताथैय्याची जादू जशीच्या तशी उतरली असल्याबद्दल साजिदने समाधान व्यक्त केले. मुळात या चित्रपटाचा नायक अजय देवगण असल्याने त्याला जितेंद्रच्या स्टाईलमध्ये उडय़ा मारत नाचवणे हे नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिच्यासाठी मोठे आव्हान होते. ‘अजय या गाण्यावर जितेंद्रप्रमाणेच नृत्य करू शके ल याबाबत मी साशंक होते. पण अजयने पहिल्याच टेकमध्ये ओके केल्यावर संपूर्ण युनिट आश्चर्यचकित झाले होते’, असे फराहने सांगितले. साजिदनेही याबाबतीत फराहची री ओढली. ‘माझ्या चित्रपटातील गाण्याची आणि जुन्या ‘हिम्मतवाला’तील गाण्याची तुलना होणारच, ती व्हायलाही हवी. हे गाणे तसेच्या तसे व्हावे यासाठी ऐंशीच्या दशकातील कपडय़ांपासून ते सेटपर्यंत प्रत्येक गोष्ट मी काटेकोर काळजी घेऊन तयार केले आहे. पण, अजय आणि जितेंद्रची तुलना होणे मात्र शक्य नाही. जितेंद्र त्यावेळी अभिनयाबरोबरच नृत्यासाठी प्रसिध्द होते. त्यांच्या नृत्याची स्वतची एक शैली होती. त्यामुळे त्या स्तरावर तरी अजयची तुलना त्यांच्याशी होऊ नये’, अशी अपेक्षा साजिदने व्यक्त केली. १९८३ साली आलेल्या के. राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील या गाण्याचे महत्त्व ओळखून निर्माता युटीव्ही मोशन पिक्चर्स आणि वाशु भगनानी यांनी ‘सारेगम’ कंपनीकडून गाण्याचे हक्क विकत घेतले. ‘ऐंशीच्या दशकातील या गाजलेल्या गाण्यांची जादू पुन्हा जिवंत व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘हिम्मतवाला’च्या रिमेकमुळे आम्हाला काही प्रमाणात यश मिळाले आहे’, असे सारेगमचे प्रमुख आदर्श गुप्ता यांनी सांगितले. युटीव्हीने सारेगमशी काही निवडक चित्रपटांसाठी करार केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. सेटपासून कपडय़ांपर्यंत प्रत्येक गोष्ट तशीच्या तशी उतरल्याबद्दल या चित्रपटाचा नायक अजय देवगणनेही आनंद व्यक्त केला.