आधीच पाणीटंचाईने हैराण, त्यात अवेळी झालेल्या गारपिटीचा तडाखा अशा कात्रीत जिल्ह्य़ातील शेतकरी सापडले आहेत. सोमवारीही सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक, पळशी, बाभूळगाव, उमरा, वरखेडा, वाघदरी, दाताडा या गावांमध्ये संध्याकाळी गारपीट झाली. अनेक मोठी झाडे पडली. शेतातील गहू, हरभरा पिकांची वाताहत झाली. या बरोबरच कळमनुरी तालुक्यातील उमरा, खानापूर, शिवणी भागातही गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
दरम्यान, जिल्ह्य़ाच्या काही भागात बुधवारी व गुरुवारी गारपिटीने झालेल्या शेतातील पिकांच्या नुकसानभरपाईबाबत पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिल्या आहेत. सोमवारी दुपारीही हिंगोली शहर व परिसरात रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होती व अधूनमधून विजांचा गडगडाट सुरू होता.
जिल्ह्य़ात दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे सुमारे १ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पालकमंत्री गायकवाड, आमदार दांडेगावकर व सातव यांनी औंढा नागनाथ, तर जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी सेनगाव तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. कृषी विभागामार्फत पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई बाबत अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सेनगाव तालुक्यातील भगवती, तपवन, कडोलीसह इतर गावांवर तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा, वाळकी, गंलाडी व हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव नाका, वसमत तालुक्यात पांगरा शिंदे, शिंदगी आदी भागात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. आजमितीस गहू ओंब्यावर, तर ज्वारीचे पीक कणसे भरण्याच्या स्थितीत असताना निसर्गाने गारपिटीतून शेतकऱ्यांच्या पिकांवर घाला घातला. ऐन हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहर गळून पडला.