नाटक-एकांकिका आणि नाटय़गृह हे समीकरण अतूट आहे. मात्र, माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात यू टय़ूबवर एकांकिका सादर झाल्या तर.. होय, असा प्रयोग ‘अस्तित्व’ नाटय़संस्था आणि मुंबई थिएटर गाईड संकेतस्थळ यांच्यातर्फे नुकताच करण्यात आला. या पहिल्या ई-नाटय़शोध बहुभाषिक एकांकिका स्पर्धेतील सहभागी एकांकिका या चक्क ‘यू टय़ूब’ वरून सादर करण्यात आल्या.
या स्पर्धेत अंकित गोर लिखित व दिग्दर्शित ‘आय वॉण्ट टू ट्वीट’ या गुजराती भाषेतील एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. ही एकांकिका ए. जी. प्रॉडक्शन-अहमदाबाद यांनी सादर केली होती. स्पर्धेत प्रथम व द्वितीय उपविजेतेपद अनुक्रमे संकेत तांडेल लिखित व दिग्दर्शित ‘टेराडेक्टीलचे अंडे’ (थिएटरवाले-मुंबई) व ‘ऱ्हिदम ऑफ लव्ह’ (झेप कलामंच-मुंबई) यांना मिळाले. ऑनलाइन प्रेक्षक पसंतीचे पहिले पारितोषिक सुमित पवार दिग्दर्शित ‘टिकटिक’ (चेतना महाविद्यालय, मुंबई) एकांकिकेला तर विशेष परीक्षक सन्मान पारितोषिक योगेश सोमण लिखित व रश्मी देव दिग्दर्शित ‘माहेर’ (स्नेह-पुणे) या एकांकिकेला मिळाले. राजन खान लिखित व विपुल महागावकर दिग्दर्शित ‘बुंदे’ (तालीम थिएटर-मुंबई) यांनाही समीक्षकांच्या पसंतीचे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेसाठी एकूण ७२ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी ३१ प्रवेशिका ग्राह्य धरण्यात आल्या. या ३१ एकांकिकांमधून प्रेक्षक आणि परीक्षकांसाठी मुंबई थिएटर गाईडतर्फे ‘यू टय़ूब’च्या साह्याने २० एकांकिका ऑनलाइन सादर करण्यात आल्या. त्यातून सहा एकांकिकांची अंतिम पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांचे सादरीकरण जपून ठेवण्यासाठी आणि काही ठराविक प्रेक्षकांपुरतीच मर्यादित असलेली ही स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या २० एकांकिका आतापर्यंत ११ हजार लोकांनी ऑनलाइन पाहिल्या असून यापुढेही त्या पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे मुंबई थिएटर गाईड या संकेतस्थळाचे संचालक भाविक शहा यांनी सांगितले. ‘अस्तित्व’चे प्रमुख रवी मिश्रा यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाईन एकांकिका स्पर्धा सादर आयोजित करण्यात आली होती.