मराठवाडय़ातील महत्त्वाचे कवी वा. रा. कान्त यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ३० डिसेंबरला यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
चर्चासत्राचे उद्घाटन नामवंत समीक्षक प्रा. भुजंग वाडीकर करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील असतील. प्राचार्य डॉ. नामदेवराव कल्याणकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रा. माधवकृष्ण सावरगावकर यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. पी. विठ्ठल व डॉ. विद्यासागर पाटंगणकर निबंध वाचन करतील. तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्रभाकर देसाई व प्रा. यशपाल भिंगे निबंधवाचन करणार आहेत. डॉ. दादा गोरे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. चर्चासत्र नि:शुल्क असून ज्यांना सहभाग प्रमाणपत्र हवे आहे, त्यासाठी २०० रुपये शुल्क आकारले जाईल. यात चहा-दुपारचे जेवण देण्यात येईल. ज्या रसिक, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना चर्चासत्रात सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी डॉ. शंकर विभुते, मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, उपाध्यक्ष देविदास फुलारी, कार्यवाह कानडखेडकर गुरुजी व कोषाध्यक्ष संजीव कुळकर्णी यांनी केले आहे.