उन्हाच्या काहिलीने होरपळून निघणाऱ्या जिल्हय़ाच्या काही भागांत मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. जिल्हाभरात अचानक झालेल्या पावसाने लोकांची त्रेधातिरपीट उडवली. विजेचा कडकडाट सुरू झाला. अहमदपूर तालुक्यातील साईतांडा येथे यात एकाला आपले प्राण गमवावे लागले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर तालुक्यांत मंगळवारी संध्याकाळी चांगला पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील साईतांडा येथे वीज कोसळून नारायण थावरू चव्हाण (वय ३२) जागीच मरण पावले, तर त्यांच्यासोबत असलेले रामराव हरि चव्हाण (वय ४५) व सोनू उत्तम चव्हाण (वय ८) गंभीर जखमी झाले. औसा तालुक्यातील किल्लारीपाटी येथील ३३ केव्ही फिडरवर वीज कोसळली. त्यामुळे किल्लारीचा वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
जिल्हाभरात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, ३८ ते ४० सेल्सिअस अंशापर्यंत पाऱ्याने मजल गाठली आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीचा लोकांना चांगलाच त्रास होत आहे.
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे मात्र हवेत सुखद गारवा निर्माण झाला.