वडनेर भोलजीजवळ सोमवारी दुपारी झालेल्या विचित्र अपघातात ट्रक व दुचाकी जळून खाक झाली. यात दुचाकीस्वारही जळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अंत्रज गावाजवळ वाहन पुलावरून पडल्याने १ ठार, तर ७ जण जखमी झाले.
ट्रक (क्र. एम.एच.०४ जीयू ६२६१) नांदुऱ्याकडून मलकापूरकडे ऑईल घेऊन जात असतांना वडनेर भोलजीजवळ समोरून येणाऱ्या एमएच २८-७८९३ क्रमांकाच्या दुचाकीस्वारास धडक दिली.  त्यानंतर ट्रक उलटल्याने तो पेटला व सोबतच दुचाकीने सुध्दा पेट घेतला.  यात ट्रक व दुचाकी तसेच दुचाकीस्वार रमेश काशिराम हिवाळे (३५, रा. खुमगाव बुर्ती, ता. नांदुरा) हा जळाल्याने जागीच ठार झाला.   या आगीत दुचाकीचालक व त्याच्यासोबत असलेली एक महिला व बालक यात जळून मेल्याची चर्चा घटनास्थळी होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वडनेर पोलीस चौकीचे भगवान राठोड, ठाणेदार राम देशमुख व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी खामगाव व मलकापूर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.  या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत मध्यप्रदेशातील बैतुल येथील भाविक सैलानी येथील यात्रेवरून आज एम.पी.२८ टीसीई ००१८ या तात्पुरत्या क्रमांकाच्या मारुती इको वाहनाने परत जात होते.  दरम्यान, खामगाव-चिखली रस्त्यावरील अंत्रजजवळ चालकाचा ताबा सुटल्याने १० ते १५ फू ट उंच पुलावरून खाली कोसळले.  यात शे. साबीर शे शब्बीर (२८), शे. शाकीर (४०), कमल पवार (२१), रितेश पवार (३०), राकेश पवार (३०), तासू आहूजा (४२), शे. कालू (३५), सचीन पाल (३०, सर्व रा. बैतुल, मध्यप्रदेश) असे ८ जण जखमी झाले.  या जखमींना मस्तान चौकातील नागरिकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र या जखमीपैकी शे. साबीर शे. शब्बीर याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास हेडकाँस्टेबर बळीराम वरखेडे करीत आहेत.