शहरातील कायनेटीक चौकाजवळ चोरीच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत नेमक्या किती रकमेचा ऐवज चोरीस गेला, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तसेच हे कुटूंब पत्र्याच्या शेडमध्ये राहते. त्यामुळे घटना चोरीच्या की आणखी काही वेगळ्या उद्देशाने झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.
मारहाणीत तुकाराम केशव ढाकणे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी हौसाबाई (वय ४५) व माहेरी आलेली मुलगी अनिता आनंद झांजळे (वय २६, रा. भोर, पुणे) या दोघी जखमी झाल्या आहेत. दोघींना आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरात तिघेच होते. एकाचा मृत्यू झाल्याने व दोघींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने चोरटे नेमके किती होते, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. परंतु पोलिसांच्या अंदाजानुसार चोरटे किमान दोघे असावेत व १० ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड हजार रु. रोख असा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता आहे. लोखंडी रॉडने तिघांना मारहाण झाली, तो रॉडही पोलिसांना घरात आढळला. तुकाराम ढाकणे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी गहूखेड (आष्टी, बीड) आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकाजवळील यशराज हॉटेललगतच ढाकणे यांचे घर आहे. ढाकणे कुटुंबीय गेल्या २०-२५ वर्षांपासून नगरमध्ये राहते. तुकाराम हे पुर्वी रखवालदाराचे काम करत, सध्या ते एका किराणा दुकानात काम करतात. मुलगा गणेश फोटोग्राफी करतो. गणेश रात्री शेजारच्याच भुईकाटय़ाच्या कार्यालयात झोपतो. कालही तो तेथेच झोपला होता. जखमी अवस्थेतील आईने त्याला उठवल्यावर घटनेची माहिती कळली, नंतर ती लगेच बेशुद्ध पडली. त्यामुळे पोलिसांना अद्याप घटनेची सविस्तर माहिती मिळालेली नाही.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त अधिक्षक सुनिता ठाकरे, पोलीस उपअधिक्षक श्याम घुगे, कोतवालीचे निरीक्षक ए. टी. पवार आदींनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक राजपूत करत आहेत. प्रथमदर्शनी चोरीची घटना वाटत असली तरी यामागे वेगळे काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत असल्याचे उपअधिक्षक घुगे यांनी सांगितले.