दोन वर्षांपूर्वी घेतलेले पाचशे रुपये परत दिले नाही म्हणून आपल्या भावाला मारहाण होत असताना त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाणीत स्वत:चा जीव गमवावा लागला. शहरातील विजापूर नाका झोपडपट्टीत रात्री पावणेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
भरत ऊर्फ सुभाष अण्णाप्पा रजपूत (वय २५, रा. विजापूर नाका, झोपडपट्टी क्रमांक दोन, सोलापूर) असे मारहाणीत बळी गेलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विकास सुनील सरवळे (रा. विजापूर नाका झोपडपट्टी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत भरत याचा भाऊ विनोद रजपूत याने दिलेल्या फिर्यादीनुसार; विनोद हा आपला मृत भाऊ भरत याजबरोबर हिप्परगा तलावाकडे मासे पकडण्यासाठी निघाला होता. तेव्हा घराजवळ रस्त्यावर विकास सरवळे याने विनोद यास अडविले. दोन वर्षांपूर्वी घेतलेली पाचशेची रक्कम अद्याप परत का दिली नाही, असा जाब विचारत सरवळे याने विनोद यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी भरत याने, माझ्या भावाला का मारतोस म्हणून त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सरवळे याने रागाच्या भरात भरत यास लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली. यात सर्वागाला जबर मार बसल्याने भरत हा बेशुद्ध पडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावला. हा खुनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी विकास सरवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. परंतु त्याने घटनेनंतर पलायन केले असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.