बुधवारी साडेअकरा वाजता कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना दिलासा देणारा स्थगितीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून आला आणि सकाळपासून तयार झालेली अतितणावग्रस्त परिस्थिती एकदम निवळली. मात्र त्याआधीचा एक तास कॅम्पाकोला रहिवाशांची परीक्षा पाहणारा ठरला.
बुधवारी कॅम्पाकोलावरील कारवाईचा आणखी एक दिवस उजाडला.. पुन्हा सकाळी पोलिसांचा फौजफाटा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन उभी राहिली. रस्त्यावर पोलीस व पालिका कर्मचारी तर प्रवेशद्वाराच्या आत महिला, मुले उभी राहिली. वातावरणात प्रचंड तणाव होता. मंगळवारच्या घटनांचीच पुनरावृत्ती होती. फरक फक्त लहानसाच. मंगळवारी कुलूप लावलेल्या प्रवेशद्वाराला बुधवारी सकाळी साखळदंड बांधण्यात आला होता. पालिका मागे हटणार नाही याची कल्पना आदल्या दिवशीच आल्याने रहिवाशीही पूर्ण तयारीनिशी तयार होते. सव्वादहाला डी. वाय. पाटील अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारासमोर डंपर आणला गेला आणि कोणाला काही कळायच्या आत डंपरने दार दोन्ही खांबांमधून उचकटून टाकले आणि रस्ता मोकळा केला. पण दार उखडले गेल्यावरही रहिवाशी मागे हटायला तयार नव्हते. पोलिसांनी सौम्य लाठीमारास सुरुवात केली. १२ जणांना ताब्यात घेतले. उभ्या केलेल्या गाडय़ा हटवण्यासाठी पालिकेने टोइंग व्हॅनही आणली होती. गाडय़ा हटवण्यास सुरुवात झाली आणि रहिवाशांच्या आशेचा बांध फुटला. हमसाहमशी रडणाऱ्या महिलांनी कारवाईला विरोध सुरू ठेवला. बी. वाय अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचे पथक पोहोचले. उद्वाहनाच्या डाव्या बाजूला असलेल्या गुप्ता यांच्या घराचे दार तोडण्यात आले. त्याक्षणी सर्वोच्च न्यायालयाचा कारवाईला ३१ मे पर्यंत स्थगिती देणारा निर्णय आला..
पालिकेचे पथक माघारी फिरले. पोलिसांची कुमक परतली आणि कॅम्पाकोलात जल्लोष झाला..
रहिवाशांच्या नेतृत्वाचा ‘कात्रजचा घाट’
सकाळी नऊ वाजता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅम्पाकोला आंदोलनाचे प्रमुख अजय मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी जी दक्षिण विभागाच्या कार्यालयात चर्चेला बोलावून घेतले. रिक्त घरांचे बांधकाम पाडण्यासाठी बोलावत असल्याचा अंदाज आल्याने भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह सर्व चर्चेला गेले. पालिकेचे उपायुक्त किशोर क्षीरसागर रहिवाशांशी चर्चा करत असतानाच कॅम्पाकोलाचे प्रवेशद्वार डंपरच्या सहाय्याने पाडण्यात आले आणि पोलिसांच्या सौम्य लाठीमारानंतर पालिकेचे पथक इमारतीत गेले.