शहर परिसरात बुधवारी रात्री उशीरा झालेल्या विविध अपघातांमध्ये एक ठार तर १० जण जखमी झाले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ एक ट्रक नादुरूस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. चाळीसगाव येथील सखाराम पाटील, नामदेव पाटील हे दोघे जण दुरूस्तीचे काम करत होते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंबईकडून भरधाव  येणाऱ्या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर, सखाराम पाटील व नामदेव पाटील जखमी झाले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या एका अपघातात सीबीएस सिग्नलजवळील भुयारी मार्गाजवळ एका पादचाऱ्यास रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव मोटारसायकलने धडक दिली. त्यात खुटवडनगर येथील वसंत बागूल जखमी झाले. मुख्यालयातील पोलीस कर्मचारी जाधव यांनी बागूल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका वाहनाच्या धडकेत रात्री अकराच्या सुमारास उपनगर येथील संतोष मोरे हा जखमी झाला.
गडकरी चौकात सहकारनगरातील रहिवासी कमलाबाई गहिरे या पायी जात असताना मोटारसायकलची धडक बसल्याने जखमी झाल्या. औरंगाबाद रोडवर लक्ष्मी लॉन्सजवळ झालेल्या अपघातात रिक्षाचालक राजू गवारे जखमी झाले. चाटोरी गावाजवळ रात्री साडेसातच्या सुमारास दुचाकीने धडक दिल्याने एक पादचारी जखमी झाला. मनमाड जवळील आढळवाडी येथे झालेल्या अपघातात साक्री येथील दादाभाऊ सोनवणे हे जखमी झाले. वणीजवळ माळेफाटा येथे झालेल्या अपघातात सुरेश जगताप आणि दिनेश पवार हे दोघे जखमी झाले.