दीड लाख नव्या मतदारांसह नागपूर जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या आता ३३ लाख ८८ हजार ७८० झाली असून प्रथमच नोंदणी करणाऱ्या अठरा वर्षांच्या मतदारांची संख्या ३६ हजार आहे. विविध कारणांमुळे ४२ हजार ६०९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या संख्येच्या तिप्पट नव्याने नोंदणी झाली आहे, हे विशेष.
लोकसभा निवडणूक जवळ आली असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्य़ात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. मतदारांचे छायाचित्र घेण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार नागपूर जिल्ह्य़ात ३३ लाख ८८ हजार ७८० आहेत. त्यापैकी १७ लाख ७६ हजार १०३ पुरुष व १६ लाख १२ हजार ६०४ महिला आहेत. त्यापैकी ३१ लाख १ हजार ३५३ मतदारांकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे. ३ लाख २८ हजार ७८५ मतदारांजवळ ओळखपत्रे नाहीत. ३० लाख ६० हजार २०५ मतदारांचे यादीत छायाचित्र आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या अठरा वर्षांच्या मतदारांची संख्या ३६ हजार आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात १७ लाख ८६ हजार ८८१ तर रामटेक लोकसभा मतदार संघात १६ लाख १ हजार ८९९ मतदार आहेत.
दोन ठिकाणी नाव असणे, मरण पावलेले, स्थानांतरित झालेले आदी कारणांमुळे ४२ हजार ६०९ मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यात काही बोगस मतदारांचाही समावेश आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून ७ हजार ५३, दक्षिण-पश्चिम मतदार संघातून ४ हजार ४६०, दक्षिण नागपुरातून २ हजार ७०८, पूर्व नागपुरातून ५ हजार ३६५, मध्य नागपुरातून १ हजार ३२७, पश्चिम नागपुरातून ५ हजार २३८ नावे वगळण्यात आली. काटोल मतदार संघातून १ हजार ६१७, सावनेर मतदार संघातून १ हजार ७५६, हिंगणा मतदार संघातून ३ हजार ८६१, उमरेड मतदार संघातून ४ हजार १०२, कामठी मतदार संघातून १ हजार ९००, रामटेक मतदार संघातून १ हजार ९०० नावे वगळण्यात आली.